आयसीसी विश्वचषकात बेन स्टोक्स पुन्हा एकदा इंग्लंडसाठी हिरो म्हणून समोर आला. फॉर्मेट कोणताही असो, इंग्लंड संघात जेव्हा जेव्हा अडचणी येतात तेव्हा हा खेळाडू एकट्याने संघासाठी सामना जिंकतो. पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० विश्वचषक २०२२ च्या अंतिम सामन्यातही असेच दृश्य पाहायला मिळाले. जेतेपदाच्या लढतीत बाबर आझमच्या संघाविरुद्ध ५२ धावांची नाबाद खेळी खेळून स्टोक्स पुन्हा एकदा इंग्लंडच्या विजयाचा हिरो ठरला. या विजयासह, स्टोक्सने २०१६ च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत कार्लोस ब्रॅथवेटने दिलेली ६ वर्षांपूर्वी दिलेली जखम आज भरुन निघाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१६ च्या विश्वचषकाचा अंतिम सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला. शेवटच्या षटकात विंडीजला २४ धावांची गरज होती. त्यानंतर ब्रेथवेटने स्टोक्सच्या पहिल्या ४ चेंडूंवर ४ षटकार मारून संघाला विजेतेपद मिळवून दिले. त्यावेळी स्टोक्सची कारकीर्द इथेच संपुष्टात येऊ शकते, असे बोलले जात होते. तसेच बेन स्टोक्स नैराश्यात सुद्धा गेला होता. पण या खेळाडूने हार मानली नाही आणि इंग्लंड क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा मॅटविनर म्हणून उदयास आला. स्टोक्सने इंग्लंडला २०१९ च्या विश्वचषकाचे विजेतेपदही स्वबळावर जिंकून दिले. याशिवाय ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऍशेसमधील त्याची खेळी कोणीही विसरू शकत नाही.

२०१६ च्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये जेव्हा कार्लोस ब्रॅथवेटने ४ षटकार मारले, तेव्हा कॉमेंट्रीमध्ये या खेळाडूचे नाव लक्षात ठेवा असे म्हटले होते. पण त्यावेळी स्टोक्सच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं. पुढच्या ६ वर्षात स्टोक्सने जितकी प्रसिद्धी मिळवली तितकी ब्रॅथवेटला मिळवता आली नाही. बेन स्टोक्सचा झिरो ते हिरो असा हा प्रवास होता. त्या घटनेच्या ६ वर्षांनंतर स्टोक्सने टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावून सुटकेचा नि:श्वास सोडला असेल.

आजच्या सामन्याबद्दल बोलायचे तर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडसमोर विजयासाठी १३८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडची चांगली सुरुवात झाली, मात्र पाकिस्तानी गोलंदाजांनी मध्यंतरी जोरदार पुनरागमन केले. स्टोक्स सुरुवातीला थोडा संघर्ष करत होता, पण त्याला त्याच्या क्षमतेवर विश्वास होता. त्यामुळे त्याने दबावातही आपली विकेट फेकली नाही.

हेही वाचा – ENG Win World Cup: लहानपणीच भावंडांची हत्या, संघर्ष अन्… इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला स्टोक्स खऱ्या आयुष्यातही लढवय्या

शाहीन आफ्रिदीच्या दुखापतीनेही इंग्लंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. ब्रुक्सचा झेल घेताना आफ्रिदी जखमी झाला. जेव्हा तो १६व्या षटकात गोलंदाजी करायला आला तेव्हा फक्त १ चेंडू टाकल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि त्याने मैदान सोडले. येथून इंग्लंडने आक्रमणाला सुरुवात केली आणि अवघ्या १८ चेंडूत सामना संपवला.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ben stokes england biggest match winner his journey from zero to hero from 2016 to 2022 pak vs eng vbm