इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा (IPL 2022) ४२ व्या सामना लखनऊ सुपरजायंट्स (LSG) आणि पंजाब किंग्जमध्ये (PBKS) पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात लखनऊने पंजाबचा २० धावांनी पराभव केला. मात्र, यानंतरही पंजाबच्या क्षेत्ररक्षणाची सध्या जोरदार चर्चा आहे. याला कारण आहे, पंजाबच्या जॉनी बेयरस्टोचं क्षेत्ररक्षण. बेयरस्टोने दीपक हुड्डाला आपल्या ‘बुलेट थ्रो’ने धावबाद केलं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फलंदाजीला दीपक हुड्डा असताना त्याने एका चेंडूवर फटका मारला. चेंडू डीपमध्ये गेला. तेथे जॉनी बेयरस्टोने चेंडू अडवला. यावेळी दीपक हुड्डा दुसरी धाव घेण्यासाठी पळाला, मात्र बेयरस्टोने मैदानाच्या सीमेवरून केलेला थ्रो हुड्डा पोहचण्याआधीच थेट स्टंपवर आदळला आणि दीपक हुड्डा बाद झाला. हा डायरेक्ट थ्रो हुड्डासाठी देखील अचंबित करणारा होता. बाद झाल्यानंतर ही भावना त्याच्या चेहऱ्यावर देखील पाहायला मिळाली.

फोटो सौजन्य – आयपीएल</figcaption>

व्हिडीओ पाहा :

‘बुलेट थ्रो’चा आणखी एक व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पंजाबने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजीला मैदानात उतरलेल्या लखनऊने २० षटकात ८ बाद १५३ धावा केल्या. मात्र, विजयासाठी १५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पंजाबला २० षटकात ८ बाद १३३ धावाच करता आल्या.

लखनऊ सुपर जायंट्सची इनिंग

लखनऊकडून क्विंटन डी कॉकने ३७ चेंडूत ४६ धावांची दमदार खेळी केली. यात त्याच्या ४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. त्याला जितेश शर्माने झेलबाद केलं. दीपक हुड्डाने १ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २८ चेंडूत ३४ धावांची खेळी केली. तो जॉनी बेयरस्टोच्या गोलंदाजीवर धावबाद झाला. याशिवाय दुष्मंथा चमीराने १० चेंडूत १७ धावा, मोहसिन खानने ६ चेंडूत नाबाद १३ धावा आणि जेसन होल्डरने ८ चेंडूत ११ धावा केल्या.

पंजाबकडून कगिसो रबाडाने सर्वाधिक भेदक गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात ३८ धावा देत ४ विकेट घेतल्या. याशिवाय राहुल चहरने २ विकेट, तर संदीप शर्माने १ विकेट घेतली.

पंजाब किंग्सची इनिंग

पंजाबकडून फलंदाजीत जॉनी बेयरस्टोने २८ चेंडूत ३२ धावा केल्या. यात त्याच्या ५ चौकारांचा समावेश आहे. कर्णधार मयांक अग्रवालने २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १७ चेंडूत २५ धावा केल्या. ऋषी धवनने २२ चेंडूत नाबाद २१ धावा केल्या. त्याने ३ चौकार आणि १ षटकार लगावला. लियाम लिविंगस्टोनने १६ चेंडूत १८ धावा केल्या. यात त्याच्या २ षटकारांचा समावेश आहे.

गोलंदाजीत लखनऊकडून मोहसिन खानने ४ षटकात २४ धाव देत ३ विकेट घेतल्या. चमीरा आणि कृणाल पांड्याने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

आयपीएल गुणतालिकेत लखनऊ आणि पंजाबचं स्थान काय?

पंजाबने आतापर्यंत आयपीएल २०२२ च्या १५ व्या हंगामात ९ सामने खेळले. यापैकी पंजाबने ४ सामने जिंकले, तर ५ सामन्यांमध्ये पराभव पत्करला. सध्या गुणतालिकेत पंजाब ८ गुणांसह सातव्या स्थानावर आहे. दुसरीकडे लखनऊने आतापर्यंत ९ पैकी ६ सामने जिंकले आहेत, तर ३ सामन्यांमध्ये पराभव स्वीकारला. लखनऊ गुणतालिकेत १२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

विशेष म्हणजे हे दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने आले आहेत. पंजाब किंग्जने मागील सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला पराभूत केलं होतं. लखनऊ सुपर जायंट्सने मागील सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभूत केलं होतं.

हेही वाचा : लखनऊचा पंजाबवर २० धावांनी विजय, PBKS च्या २० षटकात ८ बाद १३३ धावा

मयंक अग्रवालच्या नेतृत्वातील पंजाबने आपल्या संघाच्या प्लेईंग ११ मध्ये कोणताही बदल केलेला नव्हता. दुसरीकडे लखनऊच्या संघात एक बदल करण्यात आला होता. मनीष पांडेच्या जागेवर आवेश खानला पुन्हा संधी देण्यात आली होती.

पंजाब किंग्स प्लेइंग इलेवन

मयंक अग्रवाल (कर्णदार), शिखर धवन, भानुका राजपक्षे, जॉनी बेयरस्टो, लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), ऋषी धवन, कगिसो रबाडा, राहुल चहर, संदीप शर्मा, अर्शदीप सिंह

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेवन

केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), दीपक हुड्डा, मार्कस स्टोयनिस, आयुष बडोनी, कृणाल पांड्या, जेसन होल्डर, दुष्मंथा चमीरा, रवि बिश्नोई, अवेश खान, मोहसिन खान

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jonny bairstow direct throw from deep deepak hooda run out in ipl 2022 lsg vs pbks pbs
First published on: 30-04-2022 at 00:31 IST