इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या बाद फेरीतील स्थान आधीच निश्चित करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जचा रविवारी किंग्ज इलेव्हन पंजाबशी सामना होणार आहे. चेन्नईच्या दृष्टीने गुणतालिकेतील अग्रस्थान टिकवण्याचे लक्ष्य असेल, तर पंजाबला गृहमैदानावरील अखेरच्या सामन्यात प्रतिष्ठा जपण्यासाठी विजयाची आवश्यकता आहे.
मुंबई इंडियन्सवरील विजयानंतर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईने दिमाखदार मुसंडी मारताना याआधीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला ८० धावांनी पराभूत केले. या विजयामुळे त्यांना पुन्हा गुणतालिकेतील अग्रस्थान गाठता आले आहे.
मुंबईविरुद्ध मोठय़ा फरकाने पराभव पत्करल्यामुळे चेन्नईची निव्वळ धावगती खालावली आहे. त्यामुळे अव्वल स्थान टिकवण्यासाठी चेन्नईला अखेरच्या सामन्यात विजयसुद्धा पुरेसा आहे. कारण या विजयामुळे त्यांच्या खात्यावर सर्वाधिक २० गुण जमा होतील.
दिल्लीविरुद्धच्या याआधीच्या सामन्यात कर्णधार धोनी आणि सुरेश रैनाने शानदार फलंदाजी करीत ४ बाद १७९ ही आव्हानात्मक धावसंख्या उभारली. त्यानंतर दिल्लीला फक्त ९९ धावांत रोखले. इम्रान ताहीर आणि रवींद्र जडेजा यांनी मिळून सात फलंदाजांना तंबूची वाट दाखवली. धोनी, रैना, अंबाती रायुडू, शेन वॉटसन आणि फॅफ डय़ू प्लेसिस यांच्यावर चेन्नईच्या फलंदाजीची भिस्त आहे.
पंजाबने १३ सामन्यांतून १० गुण मिळवल्यामुळे त्यांच्या बाद फेरीच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. ते गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहेत. कोलकाताविरुद्धच्या पराभवामुळे त्यांच्या आशा मावळल्या आहेत. पंजाबचे ख्रिस गेल आणि लोकेश राहुल हे फलंदाज सातत्याने धावा करीत आहेत. मधल्या फळीतील सॅम करन, मयांक अग्रवाल आणि निकोलस पूरण यांनीही अधिक जबाबदारीने फलंदाजी करण्याची गरज आहे. कर्णधार रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद शमी यांच्यावर त्यांच्या गोलंदाजीची मदार आहे.
संघ : चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), सुरेश रैना, अंबाती रायुडू, शेन वॉटसन, फॅफ डय़ू प्लेसिस, मुरली विजय, केदार जाधव, रवींद्र जडेजा, ध्रुव शौरी, चैतन्य बिश्नोई, ऋतुराज गायकवाड, ड्वेन ब्राव्हो, कर्ण शर्मा, इम्रान ताहिर, हरभजन सिंग, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, मोहित शर्मा, के. एम. आसिफ, दीपक चहर, एन. जगदीशन, स्कॉट कुगेलिन.
किंग्ज इलेव्हन पंजाब : रविचंद्रन अश्विन (कर्णधार), लोकेश राहुल, ख्रिस गेल, मयांक अग्रवाल, सर्फराज खान, डेव्हिड मिलर, मनदीप सिंग, सॅम करन, अँड्रय़ू टाय, मुरुगन अश्विन, मोहम्मद शमी, मुजीब उर रहमान, करुण नायर, मोझेस हेन्रिक्स, वरुण चक्रवर्ती, हरप्रीत ब्रार, सिमरन सिंग, निकोलस पूरण, हार्डस व्हिलजोएन, अंकित राजपूत, अर्शदीप सिंग, दर्शन नळकांडे, अग्निवेश अयाची.
सामन्याची वेळ : दुपारी ४ वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १