सध्या श्रीलंकेतील क्रिकेटमध्ये बरीच उलथापालथ होत असून त्याबाबत मी खूप निराश झालो आहे. म्हणूनच विश्वचषक स्पर्धेदरम्यान श्रीलंका संघाला मदत करण्याबाबत ठेवण्यात आलेला प्रस्ताव मी नाकारला आहे, अशी कबुली श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने याने दिली.
‘‘श्रीलंका संघाला मदत करण्याबाबतचा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवण्यात आला होता. पण माझ्याकडे अनेक कामे असून मी त्यासाठी करारबद्ध झालो आहे. त्याहीपेक्षा मला श्रीलंका संघातील माझ्या भूमिकेविषयीची नीट कल्पना नव्हती. संघनिवड आणि अन्य सर्व गोष्टी घडल्या असताना, मी मेहनत घेण्याजोगे कोणतेही काम नव्हते. म्हणूनच मी हा प्रस्ताव नाकारला,’’ असे जयवर्धनेने सांगितले.
महेला जयवर्धने, कुमार संगकारा आणि अरविंद डीसिल्व्हा या माजी खेळाडूंनी प्रशासनाबाबत काही शिफारशी सुचविल्याचा अहवाल गेल्या वर्षी श्रीलंका क्रिकेट मंडळाकडे सादर केला होती. मात्र त्यांच्या शिफारशी मंडळाने फेटाळून लावल्या होत्या. त्याबाबत जयवर्धने म्हणाला, ‘‘आठ महिने मेहनत घेऊन आम्ही क्रिकेटच्या स्वरूपाबाबतचा व्यावसायिक अहवाल सादर केला होता. सध्या देशातील क्रिकेटची परिस्थिती दोलायमान झाली असून आमचे खेळाडू ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंडमधील लीग स्पर्धामध्ये जाऊन खेळावे, असे आम्हाला वाटत नाही. त्यासाठी अनुभवींनीच क्रिकेटच्या पद्धतीत बदल करावेत, असे आम्हाला वाटले होते.’’