ऑकलंड : नवोदित वेगवान गोलंदाज हेन्री शिपलेच्या (५/३१) भेदक माऱ्याच्या बळावर न्यूझीलंडने पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात पाहुण्या श्रीलंकेचा १९८ धावांनी धुव्वा उडवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ईडन पार्कच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात यजमान न्यूझीलंडने दिलेल्या २७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव १९.५ षटकांत ७६ धावांतच आटोपला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध श्रीलंकेची ही सर्वात नीचांकी धावसंख्या ठरली. या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेने सुरुवातीपासूनच ठरावीक अंतराने गडी गमावले. त्यांचा एकही फलंदाज २० धावांचा टप्पा ओलांडू शकला नाही. आपला चौथा एकदिवसीय सामना खेळत असलेल्या शिपलेने पथुम निसंका (९), कुसाल मेंडिस (०), चरिथ असलंका (९), कर्णधार दसून शनाका (०) आणि चमिका करुणारत्ने (११) यांना माघारी धाडत आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत प्रथमच पाच बळी मिळवण्याची किमया साधली.

तत्पूर्वी, श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचे आमंत्रण दिल्यावर न्यूझीलंडचा डाव ४९.३ षटकांत २७४ धावांवर संपुष्टात आला होता. सलामीवीर फिन अ‍ॅलनने (५१) अर्धशतकी खेळी केली. तसेच पदार्पणवीर रचिन रवींद्र (४९), डॅरेल मिचेल (४७) आणि ग्लेन फिलिप्स (३९) यांनीही महत्त्वाचे योगदान दिले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New zealand beat sri lanka by 198 runs in 1st one day match zws zws