इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघात करोनाने प्रवेश केला. त्यामुळे मँचेस्टर येथे होणारा पाचवा कसोटी सामना रद्द करण्यात आला. भारतीय क्रिकेट संघाचे साहाय्यक फिजिओ योगेश परमार यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सामना रद्द झाल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली. त्यानंतर बीसीसीआय सचिव जय शाह यांनीही चाहत्यांची माफी मागत हा सामना पुढील काळात खेळवण्यासाठी ईसीबीला ऑफर दिली. आता बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीनेही मँचेस्टर कसोटीच्या भवितव्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंग्लंडच्या क्रिकेट प्रतिनिधींना भेटण्यासाठी गांगुली २२ सप्टेंबरला यूके गाठणार आहे. मँचेस्टर कसोटीच्या संभाव्य आयोजनाची चर्चा करण्यासाठी गांगुली यूकेला जाईल. हा कसोटी सामना न खेळवता आल्यामुळे दोन्ही क्रिकेट बोर्डांना मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे, त्यामुळे गांगुली अधिकृत प्रसारकांशी भेटून परिस्थितीचे निराकरण करण्याचा प्रयत्न करेल.

आधीच बसलाय करोनाचा फटका…

मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण यांच्यानंतर परमार यांना करोनाची लागण झाल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाला गुरुवारचे सराव सत्र रद्द करावे लागले. संघामधील सर्व खेळाडूंच्या करोना चाचण्या घेण्यात आल्या. सावधगिरी म्हणून भारतीय चमूला आपापल्या खोलीत थांबण्याचे निर्देश देण्यात आले होते. शास्त्री यांच्या संपर्कातील भारताचे मुख्य फिजिओ नितीन पटेल सध्या विलगीकरणात असल्यामुळे पाचव्या कसोटीस संघासोबत फिजिओ नव्हते. क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक आर. श्रीधरसुद्धा विलगीकरणात असून, फक्त फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड संघासोबत आहेत.

हेही वाचा – T20 World Cup: संघात स्थान न दिल्यानं दिग्गज क्रिकेटपटू झालाय निराश; म्हणतो, “मी १० वर्ष…”

सर्व खेळाडू आणि मार्गदर्शकांचे लसीकरण पूर्ण झाले असले तरी इंग्लंडमध्ये जनजीवन पूर्वपदावर आल्यामुळे दोन्ही संघांमधील खेळाडू सध्या जैव-सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करीत नाहीत. लंडनमध्ये पुस्तक प्रकाशनाच्या सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर शास्त्री यांना करोनाची लक्षणे आढळून आली आहेत. या कार्यक्रमाला अरुण, पटेल आणि श्रीधर यांनीही हजेरी लावली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sourav ganguly to travel england and meet with ecb for manchester test rescheduling adn