Female Andre Russell: सध्या सुरू असलेल्या वुमेन प्रीमियर लीग स्पर्धेत वेस्ट इंडिजची अष्टपैलू खेळाडू चिनेल हेन्री यूपी वॉरियर्ससाठी खेळत आहे. या स्पर्धेत यूपीकडून खेळताना चिनेलने दमदार कामगिरी केली आहे. चिनेलच्या फलंदाजीच्या आक्रमक शैलीमुळे तिची तुलना आधीच वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलशी होत आहे. दरम्यान रसेलशी तुलना होणे माझ्यासाठी गौरव असल्याचे चिनेल हेन्रीने म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डिव्हिलियर्सला पाहून क्रिकेट खेळायला सुरुवात

क्रिकेटबाबत बोलताना चिनेल हेन्री म्हणाली की, “खरं सांगायचं तर, लहानपणी मी कधीच फारसे क्रिकेट पाहत नव्हते. पण जेव्हा मी क्रिकेट समजून घेऊ लागले आणि खरोखरच त्यात गुंतले तेव्हा मी दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सला पाहू लागले. त्याचे क्षेत्ररक्षण, त्याची फलंदाजी, त्याची अष्टपैलू खेळ करण्याच्या क्षमतेमुळे मलाही त्याच्यासारखे व्हावे असे वाटू लागले. तो ज्या पद्धतीने फलंदाजी करायचा आणि काही चेंडूंत सामना बदलायचा ते खरोखरच अविश्वसनीय होते.” एएनआयशी संवाद साधताना चिनेल हेन्रीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

लेडी आंद्रे रसेल…

पुढे बोलताना चिनेल हेन्री म्हणाली की, “एबी निवृत्त झाल्यानंतर, माझे लक्ष माझा देशबांधव आंद्रे रसेलकडे वळाले. वेस्ट इंडिजमध्ये, अनेकजण मला लेडी आंद्रे रसेल म्हणतात, म्हणून लेडी आंद्रे रसेल म्हणून ओळख मिळवणे माझ्यासाठी बहुमान आहे. त्याच्यासारखी पॉवर-हिटिंग आणि मॅचविनिंग कामगिरी करणे हे माझे ध्येय आहे.”

२०० च्या स्ट्राइक रेटने धावा

दरम्यान यंदाच्या वुमेन प्रीमियर लीगमध्ये चिनेल हेन्रीने २०० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. याबाबत बोलताना ती म्हणाली, “मी १५० च्या स्ट्राइक रेटने नेहमीच धावा केल्या आहेत. परंतु गेल्या वर्षभरात मी घेतलेल्या मेहनतीमुळे या स्पर्धेत माझा स्ट्राइक रेट २०० च्या वर गेला. या स्पर्धेत आम्ही काही अविस्मरणीय विजय मिळवले आहेत. जरी आम्ही संघ म्हणून कमी पडलो असलो तरी, वैयक्तिकरित्या, मी सातत्याने माझ्या संघाच्या विजयात योगदान देत राहू इच्छिते.”

यंदाच्या वुमेन प्रीमियर लीगमध्ये हेन्रीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध फक्त २३ चेंडूत ६२ धावांची खेळी केली होती. या हंगामातील ही तिची सर्वोत्तम खेळी केली होती. या खेळीत दोन चौकार आणि आठ षटकारांचा समावेश होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wpl chinelle henry andre russell comparison aam