मोबाईल कव्हर्सच्या कितीही युनिक डिझाइन्स बाजारात आल्या तरी ट्रान्सपरंट कव्हरचा ट्रेंड काही कमी होताना दिसत नाही. स्वस्तात मस्त असलेली ही कव्हर्स टिकतातही खूप दिवस आणि त्यामुळे मोबाईलची मागील बाजूही नीट दिसते. हजारो रुपयांचा मोबाईल घेतला आणि त्याचा पार्श्वभाग नीट दिसला नाही, तर काय मज्जा, असा विचार करून अनेक जण ट्रान्सपरंट कव्हर खरेदी करतात. विशेषत: आयफोन युजर्स अशा प्रकारच्या कव्हर्सना पसंती देतात. पण अशा प्रकारचे कितीही महागडे कव्हर खरेदी केले तरी ते काही दिवसांनी मळकट आणि पिवळे दिसू लागते. त्यामुळे मोबाईलचा लूक बिघडून खराब दिसतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कितीही प्रयत्न करूनही ट्रान्सपरंट मोबाईल कव्हर स्वच्छ होत नाही. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला ट्रान्सपरंट मोबाईल कव्हर स्वच्छ करण्यासाठी टिप्स सांगणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही काही मिनिटांत मोबाईल ट्रान्सपरंट कव्हर स्वच्छ करू शकता.

मोबाईलचे ट्रान्सपरंट कव्हर स्वच्छ करण्यासाठी टिप्स

१) टूथपेस्ट

मोबाईल बॅक कव्हर स्वच्छ करण्यासाठी तुम्ही टूथपेस्ट आणि मिठाचा वापर करू शकता. त्यासाठी प्रथम कव्हरवर टूथपेस्ट लावा आणि पाण्यात भिजवून, ती घासून घ्या. त्यानंतर एक मिनिटानंतर फोन कव्हरवर एक किंवा दोन चिमूटभर मीठ शिंपडा आणि ती स्वच्छ घासून घ्या. त्यामुळे तुमच्या मोबाईलचे कव्हर चमकेल.

२) व्हिनेगर

व्हिनेगरच्या मदतीने मळकटलेले पिवळे मोबाइल कव्हर सहज साफ करता येईल. त्यासाठी तुमचे मोबाईल कव्हर केस एका भांड्यात ठेवा. त्यानंतर त्यात दोन चमचे बेकिंग सोडा, एक कप पाणी व २-३ चमचे व्हिनेगर टाकून, ते कव्हर काही वेळ भिजवत ठेवा. तासाभरानंतर टूथब्रशच्या मदतीने कव्हर केस घासून स्वच्छ करा.

३) बेकिंग सोडा

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही फक्त बेकिंग सोड्याच्या मदतीनेही मोबाईलचे ट्रान्सपरंट कव्हर चमकवू शकता. त्यासाठी सर्वप्रथम कव्हर केस ओल्या टॉवेलने पुसून घ्या. नंतर त्यावर बेकिंग सोडा टाका आणि टूथब्रश ओला करून, फोन कव्हर घासून घ्या. जो भाग अधिक पिवळसर दिसतोय, तो भाग घासून स्वच्छ करा.

४) डिश सोप

मोबाईल कव्हरचा पिवळसरपणा तुम्ही डिश सोपच्या मदतीनेही साफ करू शकता. त्यासाठी एक चमचा डिश सोप एक कप कोमट पाण्यात विरघळवून घ्या. आता टूथब्रशच्या मदतीने फोनचे कव्हर आतून आणि बाहेरून चांगले घासून स्वच्छ करा. नंतर पाण्याने धुऊन पुसून टाका.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diy how to clean dirty and yellow transparent mobile cover at home follow this easy tips sjr