Does Maida Actually Stick To Your Guts: “काय बाई ते मैद्याचं खायचं..आपल्याला नाही बाबा पचत असलं. मी तर ऐकलंय मी मैदा म्हणे आतड्यांमध्ये जाऊन चिकटून बसतो.. “, खरंखरं सांगा अशीच वाक्य म्हणणारी एखादी तरी व्यक्ती तुम्हाला आजवर भेटली असेल ना? त्यांचं म्हणणं पूर्णपणे खोटं किंवा चुकीचं आहे असं आम्हीही म्हणणार नाही पण त्यात थोडा रंजकपणा आहे हे निश्चित. तुम्हाला कानगोष्टीचा खेळ माहित असेल ना? एकाकडून दुसऱ्याकडे माहिती जेव्हा जाते तेव्हा त्यात काही प्रमाणात बदल हा होतोच, जितकी जास्त माणसं तितका जास्त बदल. काही पदार्थांच्या बाबत सुद्धा हेच सूत्र लागू होतं. एखाद्या पदार्थाविषयी भीती जेव्हा एकाकडून दुसऱ्याकडे पसरत जाते तेव्हा त्यात मसालेदार किस्से जोडले जातात आणि भीती वाढते. उदाहरण देऊन सांगायचं तर, मैदा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिफाईंड पीठ हे आरोग्यासाठी फायद्याचं नसतं कारण प्रक्रियेदरम्यान त्यातून सगळीच पोषक तत्वे काढून टाकली जातात ही माहिती एकाकडून दुसऱ्याकडे पसरताना मैदा हा कसा चिकट पदार्थ आहे आणि तो कसा एकदा शरीरात गेला की बाहेरच पडत नाही या गोष्टी सुद्धा एक एक करून जोडल्या जातात. आज आपण या कानगोष्टीमध्ये किती तथ्य आहे हे पाहणार आहोत.

पोषणतज्ज्ञ अमिता गद्रे यांनी इंस्टाग्रामवर मैद्याबाबतचे काही गैरसमज सोडवले आहेत. “मैदा किंवा काही रिफाईंड केलेली पीठं ही चिकट असली तरी अगदी ती तुमच्या आतड्याला चिकटत नाहीत. कारण मुळातच आपण कोणतंही पीठ आहे तसं कच्च्या रूपात खात नाही. बरं जरी तुम्ही तसं खायचा प्रयत्न केला तरी ते नियमित प्रक्रियेनुसार पचनसंस्थेत कार्बोहायड्रेटच्या रूपात शोषले जाईल. याला वेळ लागू शकतो पण म्हणून मैदा तुमच्या आतड्याला चिकटूनच बसेल असं म्हणता येणार नाही, लहान व मोठं आतडं हे अत्यंत गतिमान व सक्रिय अवयांपैकी एक मानलं जातं, त्यात पदार्थ अडकून बसण्याची शक्यता अगदी नगण्य असते. “

आहारात मैदा कसा समाविष्ट करावा?

आहारतज्ज्ञ सिमरत भुई यांनी इंडियन एक्सस्प्रेसशी बोलताना नमूद केले की, मैदा एखाद्याच्या आतड्याला चिकटून राहतो असे सिद्ध करणारे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. “मैद्यामध्ये फायबरचे प्रमाण कमी असते आणि त्यात जास्त पाणी नसते, म्हणून ते नियमितपणे खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि इतर पाचन विकार होऊ शकतात. पण शिजवलेला मैदा पचण्याची प्रक्रिया अन्य पदार्थांच्या सारखीच असते. त्यामुळे, अधूनमधून मैदा असलेले पदार्थ खाल्ल्याने नुकसान होत नाही, परंतु कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानीकारक असतो.”

डॉ विकास जिंदाल, सल्लागार, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभाग, सीके बिर्ला हॉस्पिटल, दिल्ली हे सांगतात की, “काहींना मैद्याच्या सेवनामुळे पचनात अडथळे जाणवू शकतात पण एकूण आहार, हायड्रेशन यावर भर दिल्यास मैदा कमी प्रमाणात खाता येऊ शकतो. संतुलित आहाराचा एक भाग म्हणून अगदी माफक प्रमाणात मैद्याचे सेवन केल्याने पचनाच्या समस्या उद्भवण्याची शक्यता अगदी कमी असते.

मैदा खाण्याचे दुष्परिणाम

फंक्शनल न्यूट्रिशनिस्ट मुग्धा प्रधान, (सीईओ आणि संस्थापक, iThrive) यांनी सुद्धा इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, मैद्याच्या सेवनाने तात्काळ कोणताही धोका नसतो, मैदा हा दीर्घकाळासाठी गंभीर समस्या निर्माण करू शकतो आणि चांगल्या आरोग्यासाठी त्याचे वारंवार सेवन टाळले पाहिजे. मैद्यामध्ये फायबरचे प्रमाण कमी आणि ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असल्यामुळे रक्तातील साखरेची वाढ होते, त्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे त्यात ग्लूटेनचे प्रमाण जास्त असते जे खरंतर आतड्यांचे आरोग्य बिघडवणारे मुख्य कारण म्हणून ओळखले जाते. तुम्हाला गंभीर ग्लूटेन ऍलर्जी (सेलियाक रोग) किंवा सौम्य ग्लूटेन संवेदनशीलता (नॉन-सेलिआक ग्लूटेन संवेदनशीलता) असल्यास ग्लूटेनचे कमी सेवन सुद्धा नुकसानदायक ठरू शकते.

हे ही वाचा<< रिकाम्या पोटी ‘या’ पाच भारतीय पदार्थांचं सेवन केल्याने प्रत्येक सकाळ होईल सुंदर; पोट स्वच्छ होत नसेल तर पाहाच

त्यामुळे, जरी मैदा थेट आतड्याला चिकटू शकत नसला तरी, संपूर्ण धान्य निवडणे आणि प्रक्रिया केलेले पदार्थ कमी करणे चांगले पचन आरोग्य आणि एकूणच निरोगीपणासाठी फायद्याचे ठरू शकते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Can maida stick to your intestine guts experts weigh in how to include maida in your daily diet to avoid digestion issues blood sugar svs