बालाजी व्हरकट, संदीप तेंडोलकर
“पृथ्वीवरील जीवनासाठी जैवविविधता आवश्यक आहे. जैवविविधतेची हानी थांबविण्यासाठी आणि भावी पिढ्यांसाठी पृथ्वीच्या संरक्षणाचे कार्य आपण आताच केले पाहिजे” असा संदेश संयुक्त राष्ट्र संघटनेचे महासचिव ॲंटोनियो गुटेरस यांनी दिला आहे. स्थानिक तसेच जागतिक पातळीवर जैवविविधता धोक्यात आली असल्याने पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या अस्तित्वासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे म्हणून जैवविविधतेचा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर गांभीर्याने विचारात घेतला जात आहे.
जैवविविधता म्हटले की, अनेक जण प्रामुख्याने केवळ पक्षी, प्राणी यांचाच विचार करतात. स्थानिक पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावरही यावरच मोठा भर दिलेला दिसतो. जैवविविधतेच्या या दोन महत्त्वाच्या घटकांसोबतच वनस्पती, प्राणी, बुरशी आणि सूक्ष्म जीवांच्या विविध प्रकारांचा समावेश असून, त्यांच्या अस्तित्वाला माणसाच्या हव्यासामुळे धोका निर्माण झाला आहे. २१व्या शतकापर्यंत, जगभरात ८७ लाख प्रकारच्या जीवांची ओळख पटलेली आहे. या जीवांमध्ये ६,४०० सस्तन, १०,५०० पक्षी, १०,००० सरपटणारे, ८००० उभयचर, ३४,००० जलचर असे प्राणी आणि ३,९०,००० झाडे यांचा समावेश आहे. जगातील सात ते आठ टक्के जैवविविधता भारतात दिसून येते. अजूनही कितीतरी जीव अज्ञात असण्याची शक्यता आहे. वरील सर्व घटक आणि त्यांच्या नैसर्गिक प्रक्रिया एकमेकांवर अवलंबून आहेत. या सर्व प्रक्रिया जटिल असून, त्यावर विविध परिसंस्था (इकोसिस्टीम) उभ्या राहिलेल्या आहेत. हिमालय, भारत-म्यानमार सीमा प्रदेश, वाळवंटी प्रदेश व पश्चिम घाट (सह्याद्री) ही जैवविविधतेची आगारे आहेत. त्यापैकी जगातील आठ महत्वाच्या प्रदेशांपैकी महाराष्ट्रातील समुद्रकिनाऱ्यावरील पश्चिम घाट हा एक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“जीवो जीवस्य जिवनम्” अशा पद्धतीने या जैवविविधतेचे काम चालते. जैवसातत्य ही एक प्रकारची अन्नसाखळी असते. त्याशिवाय एकमेकांच्या माध्यमातून परागीकरणही होत असते. साखळीतील एक जरी दुवा निसटला, तर संपूर्ण साखळीच विखुरली जाते. आपल्या परिसंस्था सुस्थितीत आणि निरंतर कार्यरत राहण्यासाठी जैवविविधतेच्या वरील घटकांचे संरक्षण आणि जतन अत्यंत आवश्यक आहे..
महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू याचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. वाघही संकटात आहे. नैसर्गिक आपत्ती व मानवी हव्यास या दोन्हीमुळे जैवविविधतेला धोका निर्माण झालेला आहे. हवामान बदल हा निसर्गावरील मानवी आक्रमणाचाच परिणाम आहे. त्यामुळेच मोठमोठी वादळंही उद्भवतात, हिमनग आणि हिमनद्या (ग्लेशियर) वितळतात आणि त्यामुळे अनेक जल परिसंस्थांचे अधिवास नष्ट होऊन जातात. अल निनो परिणामामुळे समुद्राचे पाणी गरम होते, तसेच समुद्रातील वाढत्या प्लास्टिक प्रदूषणामुळे समुद्रातील जलचरांचे जीवन धोक्यात येतं. “मासेमारीमध्ये पूर्वीसारखं काही राहिलं नाही”, असं मच्छीमार म्हणतात. त्याचं कारणही हेच आहे. पाण्याच्या तापमानात वाढ होत राहिल्याने मासे स्थलांतर करतात किंवा ते नष्ट होत आहेत.

नैसर्गिक आपत्तीमुळे डायनासोरसारखा अवाढव्य प्राणी जिथे नष्ट झाला तिथे सूक्ष्म व अतिसूक्ष्म जीवांची काय खैर!

जंगलं तोडणे, जमिनींचे सपाटीकरण, प्राण्यांची शिकार, पाणी व वीज यांच्या गरजा भागविण्यासाठी मोठमोठी धरणे बांधणे, खोल कूपनलिका आणि विहिरी खोदणे, नद्यांचे नैसर्गिक प्रवाह रोखणे, भूगर्भातून खनिजे काढण्यासाठी जमिनीची चाळण करणे, अवाढव्य कारखानदारीतून कार्बन डाय-ऑक्साईचे उत्सर्जन करणे, त्याचप्रमाणे गाव-शहरांतील घनकचरा, सांडपाणी, मैला वा गाळ थेट पाण्यात सोडणे किंवा उघड्यावर टाकून देणे यांमुळे मिथेन वायूचे प्रमाण वाढत आहे. अशा प्रकारे आधुनिक काळात माणसाच्या विघातक कृतींमुळे नैसर्गिक आपत्तीला निमंत्रण मिळत असल्याचे दिसत आहे. एकंदरीत मानवाने आपल्या हव्यासापोटी निसर्गावर आक्रमणच केले आहे.
प्लास्टिकचा अमर्याद वापर व अव्यवस्थापनामुळे मायक्रोप्लास्टिक निर्माण होत आहे. शेती उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक खतं, कीटक वा तणनाशके वापरणे, जगभर ठिकठिकाणी चालू असलेली युद्धे या सर्वांमुळे त्या भागातील जैवविविधेच्या नैसर्गिक जीवनक्रमात बाधा निर्माण होते. कीटकनाशके फवारून पिकांचे संरक्षण करण्याच्या नादात शेतजमिनीतील अनेक प्रकारच्या बुरशी, गांडूळ यांसारखे जमिनीतील आवश्यक पोषक सूक्ष्म जीव घटक मारले जातात, तसेच परागीकरणात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या मधमाश्याही धोक्यात येतात. परिणामी अनेक पक्षी कायमस्वरूपी नष्ट होण्याची शक्यता असते. पिकांचा नाश करणाऱ्या लष्करी अळीचा प्रतिबंध करण्यासाठी आता पर्यायी जैविक अळ्यांचा वापर करण्याचा प्रयोग केला जात आहे.

सातारा जिल्ह्यातील दुष्काळी मान तालुक्यातील किरकसाल गाव

भविष्यातील धोका ओळखून जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी काही माणसे, काही गावे समोर आली आहेत. राज्यातील अशी अनेक उदाहरणे देता येतील. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी मान तालुक्यातील किरकसाल या गावातील तरुणांनी आपल्या गावातील जैवविविविधेतची नोंद ठेवून त्यांच्या रक्षणासाठी विशेष उपक्रम हाती घेतले आहेत. गावात आढळणारे लांडगे, ससे, हरणे, डुक्कर, तरस, रानमांजर यांच्याबरोबरच २०४ पक्षी, ७८ प्रकारची फुलपाखरे यांची नोंद केली. तरुणांनी सुरू केलेल्या या अभियानात आता गावातील वयस्क लोकांचा सहभागही वाढत आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील लेखा-मेंढा गाव

गडचिरोली जिल्ह्यातील लेखा-मेंढा या गावात देवाजी तोफा यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी आपल्या गावातील नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी फळझाडे तोडण्यास बंदी, गावात मासेमारी करण्यासाठी जिलेटिन अथवा अन्य कोणतेही विष वापरण्यास बंदी, मशागतीसाठी शेतात आग लावण्यास बंदी आणि मध काढण्यासाठी मधमाश्यांचे पोळे न जाळता संरक्षक साधनांच्या आधारे मध काढण्याचे तंत्र अमलात आणणे, असे निर्णय या गावाने घेतले आहेत. त्यांची काटेकोर अंमलबजावणीही ते करीत आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील पिंपळगाव वाघा गाव

अहिल्यानगर जिल्ह्यातील पिंपळगाव वाघा गावाने जलसंवर्धनाची कामे करून व सीडबॉलच्या माध्यमातून गावात पाणी व जंगल निर्माण केले. त्यामुळे गावात जैवविविधता पुनर्जीवित झाली. गावाच्या नावात असलेल वाघ आता या जंगलात अधूनमधून दिसतो, असे गावकरी सांगतात. रायगडमध्ये गिधाडे वाचविण्यासाठी मोहीम सुरू आहे. शासनानेही जैवविविधतेच्या संरक्षणासाठी कंबर कसली आहे. विविध जंगलांचे क्षेत्र संरक्षित वा अभयारण्य म्हणून जाहीर करणे, जैवविविधता कायदा अमलात आणणे, अनेक प्राणी, पक्षी, फुलपाखरे यांना संरक्षित करणे असे उपाय सरकारने केले आहेत. शासकीय धोरणांची अंमलबजावणी व प्रत्यक्ष जैवविविधतेचे संरक्षण यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे. माणसाने निसर्गाला ओरबाडून जैवविविधतेचा ऱ्हास चालवला आहे. जर हे असेच चालू राहिले, तर येणाऱ्या पिढीला काहीच शिल्लक राहणार नाही. किंबहुना येणाऱ्या पिढ्याचे अस्तित्वच धोक्यात येईल. माणूस नावाचा प्राणीही या जैवविविधतेचा एक भाग आहे आणि तोही डायनोसॉरसारखा नष्ट होणार नाही हे कुणी सांगावे?

हेही वाचा >> घरात डासांचा सुळसुळाट वाढतोय? केळीच्या सालीचा ‘हा’ सोपा उपाय डासांचा करेल नायनाट

शाश्वत विकास ध्येयांच्या माध्यमातून आंतराष्ट्रीय स्तरावर जे प्रयत्न सुरू आहेत, ते लोक सहभागाशिवाय तोकडेच ठरतील. ‍विकास आवश्यक आहे; पण विकासासाठी निसर्गालाच ओरबडणे म्हणजे ज्या होडीतून प्रवास करीत आहोत, त्या होडीलाच छिद्र करण्यासारखे आहे. या ग्रहाची हानी करण्यात माणूसच अग्रेसर असल्याने आता या ग्रहाचे रक्षण करण्याची जबाबदारी ही माणसाचीच आहे. म्हणून सर्वांनीच एकत्र येऊन जैवविविधतेच्या रक्षणासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी शासन, तसेच विविध संस्थांकडून व्यापक सक्रिय सहभाग आणि जनजागृती झाली पाहिजे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Where a giant animal like a dinosaur was destroyed what happened to microscopic organisms man should take the initiative to protect biodiversity know more about srk