Twitter Widget

कलागुणांचा शोध

गावोगावच्या दुर्लक्षित कलाकारांतील कलागुण ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या निमित्ताने महाराष्ट्राच्या रसिकांसमोर येतीलच; त्याचबरोबर मराठी रंगभूमीवरील दिग्गज नाटय़कर्मीच्या शास्त्रकाटय़ाच्या कसोटीवर उतरण्याची संधीही तरुणाईला प्राप्त होणार आहे. ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा अमीट ठसा नाटय़क्षेत्रात उमटवला आहे अशांचे मार्गदर्शन यानिमित्ताने त्यांना उपलब्ध होणार आहे. या स्पर्धेतून केवळ नाटय़क्षेत्राचेच दरवाजेच उघडणार नाहीत, तर टीव्ही मालिकांचे विशाल नभांगणही गुणी कलाकारांना खुले होणार आहे.
गेल्या वर्षी झालेल्या पहिल्यावहिल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ महोत्सवात सर्जनशीलतेने भरलेल्या तरुणाईच्या उत्साहाचा धबधबा बरसला होता. या उत्साही गुणवान कलावंतांना आयरिस प्रॉडक्शनच्या पाठिंब्यामुळे मालिकांचा पुढचा मार्गही खुला झाला आहे. ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘पृथ्वी एडिफिस’ यांच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या पहिल्या पर्वात १०० एकांकिकांच्या चाळणीतून बाहेर पडलेल्या काही गुणवंतांना मालिकाविश्वात प्रवेश मिळाला आहे.
स्पर्धेच्या रंगमंचावर तावून सुलाखून निघालेले प्रतीक गंधे, निनाद गोरे, अनुजा मुळ्ये, श्रीकांत भगत आणि पवन ठाकरे आज चित्रपट व मालिकांमध्ये चमकत आहेत. यासारखी नामी संधी तुम्हालाही मिळू शकते. त्यासाठी ‘लोकसत्ता-लोकांकिका’चे दुसरे पर्व खुणावते आहे.
‘लोकसत्ता लोकांकिका-२०१४’ स्पर्धेतील एकांकिकांमधील त्यांचा अभिनय गाजला. आयरिस प्रॉडक्शन्स ही तर या स्पर्धेची टॅलेन्ट पार्टनरच. त्यांनी स्पर्धेतील या गुणवंतांना छोटय़ा पडद्यावर चमकण्याची संधी दिली. याच संधीची दारे राज्यातील महाविद्यालयांतील नाटय़वेडय़ा तरुणाईला खुणावत आहेत. ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘पृथ्वी एडिफिस’ यांच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेसाठी रंगमंचही सज्ज झाला आहे. २९ सप्टेंबरपासून राज्यभरात ही नाटय़धुमाळी रंगणार आहे.

lokankika_ninadपुण्यात रमणबाग शाळेत शिकतानाच मी पाचवीपासून नाटकांमध्ये काम करीत होतो. आमचे शिक्षक रवींद्र सातपुते यांनी मला पहिल्यांदा स्टेजवर सादरीकरण करायला लावले. त्यानंतर दहावीपर्यंत सलगपणे मी नाटकातून काम करीत होतो. राज्यस्तरीय नाटय़ स्पर्धेतही मी पुरस्कार मिळविला आहे. पुढे शालेय शिक्षण संपूवन एस. पी. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर तिथेही पुन्हा महाविद्यालयाच्या आर्ट सर्कलमधून रंगमंचीय विश्वात सामील झालो. पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया चषक या स्पर्धामधून सातत्याने अभिनय सुरू राहिला. तृतीय वर्षांत शिकत असताना गेल्या वर्षी ‘लोकसत्ता लोकांकिका’मध्ये ‘व्हील ऑफ विप्स’ ही एकांकिका सादर केली.
लोकांकिका स्पर्धेचे वेगळेपण पहिल्याच पर्वात जाणवले. लोकांकिका स्पर्धेत सहभागी होण्याआधी तुम्हाला इथे वेगळ्या प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल असे आश्वासन आयोजकांनी दिले होते. आज त्याचा अनुभव प्रत्यक्षातही मी घेतला आहे. लोकांकिकाचे स्पर्धा स्वरूप हे म्हणूनच वेगळे आणि या कला क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त असे आहे. लोकांकिका स्पर्धेचे दुसरे वैशिष्टय़ म्हणजे स्पर्धेच्या वेळचे व्यवस्थापन तितकेच परिपूर्ण आणि सुंदर होते. प्रतिष्ठित महाविद्यालयांनी या स्पर्धेत भाग घेतला होता आणि एवढे स्पर्धक, एवढय़ा मोठय़ा प्रमाणात एकांकिका असूनही परीक्षकांनी प्रत्येक एकांकिकेनंतर सविस्तर मार्गदर्शन केले. एरव्ही, पुरुषोत्तम करंडकसाठी मोठय़ा स्टेजवर नाटक करण्याचा अनुभव असलेल्या आम्हा कलाकारांना वर्गाएवढय़ा छोटय़ाशा जागेत स्टेज, प्रॉपर्टीसकट नाटक बसविणे हा एक आव्हानात्मक अनुभव ठरला. त्यामुळे आत्मविश्वासही वाढला. एका एकांकिकेच्या बळावर ‘फुंतरू’सारख्या सिनेमात अभिनय करण्याविषयी विचारणा झाली तेव्हा खरोखरीच आनंद झाला. लोकांकिकेच्या व्यासपीठाचा उपयोग करून चित्रपटासारख्या निराळ्या कला माध्यमात काम करण्याची संधी मिळाली, याचे खूप समाधान वाटते. – निनाद गोरे (पुण्याच्या एस. पी. महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘व्हील ऑफ विप्स’ या एकांकिकेतील कलाकार)

pratikरोज पहाटे ३.३०-४ वाजता उठायचे. साडेचार वाजता पीएमटीमध्ये बसचा कंडक्टर म्हणून सेवा सुरू करायची. दीड वाजता घरी येऊन जेवण केल्यानंतर मग पुण्यात येऊन नाटकाच्या तालमीत रमून जायचं. रात्री पुन्हा घरी येऊन बरोब्बर साडेदहा वाजता ‘दिल दोस्ती दुनियादारी’ ही मालिका न चुकता पाहून मग झोपायचं हा माझा रोजचा शिरस्ता आहे.
घरात मी एकटाच कमावता असल्याने काम करून मग नाटकाचं वेड जोपासायचं हे आईने आधीच बजावून सांगितलं होतं. त्यात तिची काही चूक नाही. एकुलता एक आहे. मग नाटक , कधी चित्रपट विश्वात आलो की हे रोजचे काम विसरले जाते.
‘लोकांकिका’ हा माझ्या आयुष्यातला टर्निग पॉइंट होता. एका एकांकिकेमुळे लोकांसमोर येण्याची संधी मला मिळाली. लोक आज मला ओळखू लागले आहेत. आणि या एका लोकांकिकेने मला सुजय डहाकेंचा ‘फुंतरू’ हा सिनेमा मिळवून दिला आहे. खरोखरीच ‘लोकांकिका’ हे आमच्यासारख्या कलावंतांसाठी मोठी पर्वणी आहे. – प्रतीक गंधे (पुणे विभागीय केंद्रावर सादर झालेल्या ‘मोटिव्ह’ या एकांकिकेतील कलाकार)

shrikantbhagatमाझा जन्म साताऱ्याचा. लहानपणीच शिक्षणासाठी आमचे कुटुंब मुंबईत आले. आधी डोंबिवलीत आणि मग सातवीनंतर आम्ही अंबरनाथमध्ये स्थिरावलो. अभिनयाची आवड लहानपणापासून असली तरी मालिका किंवा नाटय़ क्षेत्रातही कधी आपला प्रवेश होऊ शकेल, असा विचार के ला नव्हता. उल्हासनगरच्या सीएचएम महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर एकांकिका स्पर्धाशी ओळख झाली. खरे तर, मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी होतो; पण काही केल्या अभ्यासात मन लागत नव्हते. अखेर, ज्या क्षणी आपल्याला अभिनयाच्याच क्षेत्रात रस आहे याची जाणीव झाली तेव्हा कलाशाखेत नव्याने प्रवेश घेतला, मात्र मध्ये शिक्षणाची तीन वर्षे फुकट गेली होती. या काळात मी गणपतीच्या मूर्ती विकण्याचा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय आणि अभिनय दोन्ही सांभाळण्यासाठी माझे दिग्दर्शक सुनील हरिश्चंद्र आणि विनोद गायकर यांनी प्रचंड मदत केली. याशिवाय महाविद्यालयातील प्राध्यापक नितीन आरेकर आणि नीना आनंद यांनीही मला वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळे आर्थिक जबाबदारी सांभाळून नाटय़ व्यवसायात करिअर करण्याचे स्वप्न मी पूर्ण करू शकतोय. माझ्या व्यवसायाचे हे तिसरे वर्ष आहे. या वर्षी माझा छान जम बसलाय आणि त्याच वेळेस ‘लोकसत्ता लोकांकिका’मधून आमच्या महाविद्यालयाच्या ‘मडवॉक’ या एकांकिकेत मला काम करायला मिळाले. ‘लोकांकिका’ स्पर्धेचे महत्त्व फार निराळे आहे. पहिल्याच वर्षी या स्पर्धेने आपला दबदबा निर्माण केलाय. आतापर्यंत ठाणे विभागातील महाविद्यालये प्रस्थापित एकांकिका महोत्सवांमध्ये फार पुढे जाऊ शकत नव्हती. खरे तर या महाविद्यालयांनी आतापर्यंत निकोप स्पर्धा करण्यावर भर दिला आहे. ‘लोकांकिका’मुळे त्यांना आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी मोठे व्यासपीठ मिळाले आहे. ‘लोकांकिका’नंतर मी ‘देवयानी’ या मालिकेत काम केले. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेचा भाग केला आणि ‘जाऊ द्या ना भाई’सारखे व्यावसायिक नाटकही करतो आहे. या सगळ्यामागे कुठे तरी ‘लोकांकिका’ स्पर्धेमुळे मिळालेली ओळखही कारणीभूत आहे असे मला वाटते. ‘लोकांकिका’ स्पर्धा पाहण्यासाठी जे प्रेक्षक तसेच नाटय़कर्मी आले होते ते आजही आमच्याशी जोडले गेले असून जेव्हा कधी भेटण्याची संधी मिळते तेव्हा ते आमचा पुढचा मार्ग कसा आहे याची चौकशी करतात. ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा ही अशीच दमदारपणे सुरू राहिली पाहिजे तरच आमच्यासारख्या कलाकारांना अभिनयाच्या क्षेत्रात पुढे जाताना मोलाची मदत होऊ शकते. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेला महाविद्यालयीन तरुणांकडून अधिक चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास वाटतो. – श्रीकांत भगत – (उल्हासनगरच्या सीएचएम महाविद्यालयाच्या ‘मडवॉक’ या एकांकिकेतील कलाकार)

pavanthackeray‘लोकसत्ता लोकांकिका’ ही गेल्या वर्षीची सर्वात मोठी एकांकिका स्पर्धा ठरली आहे. आजघडीला अनेक नावाजलेल्या एकांकिका स्पर्धा आपल्याकडे भरवल्या जातात. मात्र, या स्पर्धामध्ये सहभागी होणाऱ्यांमध्ये गेली अनेक वर्षे एकांकिकांमधून काम करणाऱ्या प्रस्थापित कलाकारांची यादी मोठी आहे. माझ्यासारख्या नवख्या तरुणाला अशा स्पर्धामध्ये क्वचितच स्थान मिळते. मात्र, ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेमुळे आमची नाटय़कला सिद्ध करण्याची संधी मिळाली. मात्र, एका एकांकिकेच्या बळावर जेव्हा मला ‘आयरिस प्रॉडक्शन’कडून मालिकेत काम करण्याबद्दल विचारणा झाली तेव्हा त्यावर खरंच विश्वास बसत नव्हता. आतापर्यंत केवळ एक एकांकिका सादर केलेला मी थेट मालिकेत काम करू शकलो, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. ‘आयरिस’ने मला चांगली भूमिका दिली. यामुळे मला पुढचे मार्ग नक्की मिळू शकतील. अभिनयक्षेत्रात नाव कमावण्याचे स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी एकांकिकेतून थेट मालिकेत काम करण्याची संधी देणारा ‘लोकसत्ता लोकांकिका’ हा मोठा सुंदर मार्ग आहे. – पवन ठाकरे (ठाण्याच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या ‘मोझलेम’ या एकांकिकेतील कलाकार)