विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्यरात्रीच्या गारठय़ात भारतीय क्रिकेट संघातील एक नामवंत गोलंदाज असलेला प्रवीण कुमार स्वत:ची गाडी काढून, रिव्हॉल्वर घेऊन आत्महत्या करण्यासाठी निघाला होता. भारतीय संघातून बाहेर फेकले गेल्यानंतर आयपीएलच्या संघातील प्रवेशही मुश्कील झाला होता. प्रचंड मानसिक तणावाच्या गर्तेत तो सापडला होता. आयुष्य संपविणे हा एकच उपाय आहे, असे वाटत होते. रिव्हॉल्व्हर कानाला लावणार त्याच वेळेस समोर गाडीतच असलेल्या आपल्या मुलांच्या हसऱ्या फोटोकडे त्याचे लक्ष गेले आणि त्याने विचार बदलला.. रविवारच्या ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये तो मन मोकळं करता झाला.. अशाप्रकारे प्रचंड तणावाला सामोरा जाणारा तो एकमेव नाही; तर धावा होतच नव्हत्या त्या काळातील पराकोटीचा तणाव आणि नैराश्य अलीकडेच कप्तान विराट कोहलीनेही व्यक्त केले. पूर्वी रिचर्ड हॅडलीनेही  तर अलिकडे ऑस्ट्रेलियाच्याच ग्लेन मॅक्सवेलनेही नैराश्य जाहीरपणे मान्य केले. नैराश्याबद्दल आता लोक स्वतहून बोलू लागले आहेत, ही चांगली बाब आहे.

अलीकडेच जेएनयूच्या विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात आपला सहभाग नोंदविणारी दीपिका पदुकोन टीकेची धनी झाली. मात्र तीही काही वर्षांपूर्वी नैराश्याच्या आहारी कशी गेली, त्याचे वर्णन जाहीररीत्या करती झाली आणि तिने लोकांना आवाहन केले की, नैराश्यात अडकू नका, डॉक्टरांची मदत घ्या. त्यात लाज वाटून घेऊ नका. हा विकार आहे, औषधोपचाराने त्यातून बाहेर पडणे सोपे आहे. आज जगभरामध्ये नैराश्यग्रस्त झालेल्यांची संख्या दिवसागणिक वाढते आहे.

म्हणूनच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या जगातील सर्वोच्च नेत्यांच्या व्यासपीठावर नैराश्याविरोधात यशस्वी लढा देणाऱ्या पाच स्त्रियांमध्ये तिला गौरविण्यात येते आहे. जगाने यांचा आदर्श ठेवावा, नैराश्य आहे हे स्वीकारावे, औषधोपचार करावे आणि त्यातून बाहेर यावे हा उद्देश या गौरवामागे आहे. कारण जगभरात नैराश्याचा विकार खूप मोठय़ा प्रमाणावर फोफावतो आहे. जगातील एकूण विकारांपैकी ४० टक्के विकार हे नैराश्याशी संबंधित आहेत.

झोप उडणे, समाजात सहभागी होणे टाळणे, आहाराच्या सवयी बदलणे, सतत आळस येणे, उदासी आणि उदासीनता, कोणत्याही गोष्टींमध्ये लक्ष न लागणे, आपल्याला सर्व गोष्टींमध्ये अपयशच येणार असे सातत्याने वाटत राहणे ही सारी त्या नैराश्याची लक्षणे आहे. त्याचा परिणाम माणसाच्या उत्पादकतेवर होतो, विचारपद्धती आणि विचारक्षमतेवरही होतो. रिकामेपणा जाणवू लागतो आणि अखेरच्या टप्प्यावर आत्महत्येचे विचार डोक्यात घोळू लागतात. काही जण प्रत्यक्ष पावले उचलतात तर काही जण रोज आयुष्य संपविण्याचाच विचार करतात. कुणाशीही बोलण्याची भीती किंवा लाज वाटते आणि कुणी बोललेच तर समाज त्यांची खिल्ली उडवतो. म्हणूनच नैराश्य आलेली माणसे बोलणे टाळतात. नैराश्याकडे आपल्या समाजात वाईट नजरेने पाहिले जाते. नैराश्याबद्दल खुलेपणाने बोलणे यात कोणताही कलंक नाही हे ठोस आणि ठामपणे सांगणारी आणि त्यातून प्रयत्नपूर्वक यशस्वीरीत्या बाहेर पडण्याचा मार्ग सांगणारी व्यक्ती म्हणून दीपिकाचा जागतिक गौरव होतो आहे. दीपिकाचे पाऊल एवढय़ाचसाठी महत्त्वाचे आहे, कारण भारतात महिलांची संख्या नैराश्याच्या बाबतीत पुरूषांपेक्षा कमी असली तरी त्यांची कुचंबणा मात्र अनेक पटींनी अधिक होते. तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी त्यांची अवस्था आहे. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्यांचे प्रमाण ९० टक्क्यांहून अधिक असते. जगात नैराश्येपोटी दर ४० सेकंदाला एक जण आत्महत्या करतो. भारत हा सर्वाधिक तरुणांचा देश आहे. आत्महत्यांमध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. देश आत्महत्यांची जागतिक राजधानी होऊ नये, यासाठी वेळीच सावध होणे गरजेचे आहे!

मराठीतील सर्व मथितार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Depression
First published on: 24-01-2020 at 01:05 IST