प्रशांत कुलकर्णी – prashantcartoonist@gmail.com

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जगात सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल, तर ते स्वत:चं आरोग्य हे निदान आता तरी लोकांना पटायला सुरुवात झाली आहे असं दिसतंय. जेव्हा आरोग्याचा विषय येतो तेव्हा स्वाभाविकपणेच आजारपण, औषधं, हॉस्पिटल, ऑपरेशन, डॉक्टर, नर्सेस वगैरे विषय डोळ्यासमोरून सरकतात. आजारी पडल्यानंतर काहीजण खूप दिवस स्वत:च स्वत:वर उपचार करतात, तर काही मोजके लोक लगेचच डॉक्टरांकडे आणि त्यातही स्पेशालिस्टकडे जातात. त्याने दिलेल्या सल्ल्यावर लगेचच दुसऱ्या स्पेशालिस्ट डॉक्टरांचं सेकंड ओपिनियन घेतात आणि त्याने दिलेलं सेकंड ओपिनियन बरोबर आहे का, हे पुन्हा पहिल्या डॉक्टरला जाऊन विचारतात.

विनोदाच्या असंख्य शक्यता असलेल्या या महत्त्वाच्या विषयावर अक्षरश: लाखो व्यंगचित्रं जगभरात काढली गेली आहेत आणि जात आहेत. पॉकेट बुक आकाराचे शेकडो छोटे संग्रह केवळ या विषयाला वाहिलेले आहेत. याशिवाय मेडिकल जर्नल्स किंवा आरोग्यविषयक नियतकालिकं इत्यादींमध्येही या विषयावरची असंख्य व्यंगचित्रं वर्षांनुर्वष पाहायला मिळतात.

बिल ओ’मेली (१९०३-१९७०) हे गेल्या पिढीतले एक महत्त्वाचे अमेरिकन व्यंगचित्रकार. वास्तविक बिल यांनी काढलेली ‘नन्स’ या विषयावरची व्यंगचित्रं ही त्यांची खरी ओळख आहे. आकर्षक रेखाटन आणि खुसखुशीत विनोद यामुळे त्यांचे संग्रह पाहत बसावेसे वाटतात. पण त्यांचा ‘फीलिंग नो पेन’ हा वैद्यकीय विषयावर आधारित व्यंगचित्रांचा संग्रह आहे, तोही असाच खुसखुशीत आहे. त्यातली काही व्यंगचित्रं उदाहरण म्हणून चर्चिली जावीत अशी आहेत.

एखाद्या गंभीर आजारी असलेल्या रुग्णावर कोणत्या पद्धतीने उपचार करायचे, यावर जर दोन डॉक्टरांमधील मतभेद रुग्णासमोरच दिसू लागले तर त्या रुग्णावर केवढा भीषण प्रसंग ओढवेल! बिल यांनी जणू काही हे दोन डॉक्टर तलवारबाजी करताहेत असे दाखवून चित्रात मजा आणली आहे.

बऱ्याच वेळा डॉक्टरना चहा प्यायलासुद्धा फुरसद मिळत नाही. अशावेळी ऑपरेशनचा वेश परिधान करूनच डॉक्टर चहा प्यायला हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये जातात आणि वेटरला चहा सांगतात आणि म्हणतात, ‘जरा लवकर.. इमर्जन्सी आहे!’ डॉक्टरांवर पडणाऱ्या अतिरिक्त ताणामुळे असे विनोद अभावितपणे होतात. पण ते नेमकेपणानं पकडणं हे व्यंगचित्रकाराचं कौशल्य आहे.

आपलं ऑपरेशन अत्यंत तज्ज्ञ डॉक्टरांनी करावं असा साहजिकच सगळ्या पेशंट्सचा रास्त आग्रह असतो. अशावेळी जर एखादा डॉक्टर ‘डू इट् युवरसेल्फ’- म्हणजे ‘सगळं तुमचं तुम्हीच करून पाहा’ असं ‘सेल्फ हेल्प’ पुस्तक घेऊन ऑपरेशन थिएटरमध्ये जात असेल तर पेशंटला भूल देण्याची गरजच भासणार नाही! बिल यांनी अशा अनेक मजेशीर कल्पना रेखाटल्या आहेत. उदाहरणार्थ, बाहुली आजारी पडली तर तिच्यासाठी एखादं ‘गेट वेल कार्ड’ आहे का, अशी विचारणा बिल यांच्या चित्रातील एक छोटी मुलगी ग्रीटिंग कार्डस्च्या दुकानात करताना दाखवली आहे.

काही डॉक्टर अत्यंत स्पष्टवक्ते असल्याचं त्यांनी रेखाटलं आहे. एका पेशंटला हे स्पष्टवक्ते डॉक्टर म्हणत आहेत, ‘तुमच्यासारखे आणखी काही पेशंट्स माझ्याकडे असते तर फार बरं झालं असतं.. ज्यांच्याकडे किडनी आणि बँक बॅलन्स आहे!’

एका चित्रात तर एक सज्जन डॉक्टर फोनवर (बहुधा आपल्या पत्नीशी) बोलताना दाखवले आहेत. त्यांच्या तोंडात वाक्य आहे.. ‘होय. फार दुर्मीळ केस होती.. त्यांनी आपलं स्वत:च बिल भरलं!’

ऑपरेशन टीव्हीवरून लाइव्ह दाखवणं याला पूर्वी खूपच अनावश्यक प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी होती. सुप्रसिद्ध ब्रिटिश नियतकालिक ‘पंच’ने आरोग्य या विषयावर खूप पूर्वी एक पुस्तक प्रकाशित केलं होतं. त्यात भरपूर कार्टून्स आणि विनोदी लेख यांची रेलचेल आहे. त्यात नॉर्मन थेलवेल यांचं एक कमाल रेखाटन असलेलं छान हास्यचित्र आहे. एखादं ऑपरेशन कव्हर करायचं असेल तर निदान टी. व्ही. वार्ताहर हा कणखर मनाचा हवा, हेच ते सांगताहेत. (‘दि पंच बुक ऑफ हेल्थ’)

याच पुस्तकात एका व्यंगचित्रात पेशंटला घरी तपासायला आलेले डॉक्टर घरच्या बाईला सांगताहेत, ‘जरा ते हेल्दी फूड वगैरेपासून लांबच राहा हं!!’

‘सेकंड ओपिनियन’ हा शब्दप्रयोग आता इतका रुजलाय, की या नावाने एका सदरासाठी केवळ वैद्यकीय विषयावरची व्यंगचित्रं मी अनेक दिवस काढत होतो. त्याच्या संग्रहाचं हे मुखपृष्ठ (मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस)! जरा नीट पाहिल्यानंतर त्यातली खरी गंमत कळून येईल.

रोग पळवण्याची, वेदनाशमन करण्याची शक्ती डॉक्टरांप्रमाणेच काही प्रमाणात विनोदी लेखनात आणि व्यंगचित्रांत असते. म्हणूनच नेहमीच्या औषधाने बरं वाटलं नाही तर ‘सेकंड ओपिनियन’ म्हणून विनोदी लेखन किंवा व्यंगचित्रं पाहावीत.. त्याने बरं वाटण्याची शक्यता खूपच अधिक असते!

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bill omalley cartoonist cartoon on health setor hasya ani bhasya dd70