विडंबनगीते, हास्यकवितांचा आस्वाद घेण्यास सरावलेल्या वाचकांसाठी ‘हजल’ हा साहित्यप्रकार तसा नवीनच. गजलेशी आपण परिचित असतो. गजल मराठीत आताशा चांगली रुळलीही आहे. पण गजलेशी साधम्र्य सांगणारी हजल मात्र मराठीत नवीनच. याचे कारण ‘हजल’ या प्रकारातील रचना मराठीत फारशी होत नाही. काही तुरळक गजलकार हजल प्रकारात रचना करत असले तरी त्यांची संख्या अगदीच कमी आहे. मराठीतील ही उणीव घनश्याम धेंडे यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘हजलनामा’ या हजलसंग्रहाने दूर झाली आहे. मराठीत संग्रहस्वरूपात आलेला हा पहिलाच हजलसंग्रह आहे. या संग्रहातील मनोगतात धेंडे यांनी ‘हजल’ या रचनाप्रकाराविषयी लिहिले आहे, ‘हजल म्हणजे एखाद्या विषयावर हसत-खेळत केलेलं भाष्य. हजल म्हणजे एका डोळ्यात हसू, तर दुसऱ्या डोळ्यात आसू.’ अवतीभवती घडणाऱ्या राजकीय-सामाजिक घटनांवर उपहासपूर्वक भाष्य हजलमधून केले जाते. मात्र हा उपहास वैयक्तिक पातळीवर खुपणारा, बोचणारा नसावा, असेही धेंडे यांनी मनोगतात म्हटले आहे. ‘हास्य विनोद नि परिहासाने जी सजली ना? तीच गजलची बहीण हजल माझी हजलीना!’ अशी काव्यमय शब्दांत हजलची व्याख्या धेंडे यांनी केली आहे. या व्याख्येचा प्रत्यय देणाऱ्या हजलरचना या संग्रहात वाचायला मिळतात. भवतालच्या राजकीय, सामाजिक पर्यावरणावर उपरोधिक भाष्य करणाऱ्या तब्बल १४३ रचना या संग्रहात आहेत. या रचनांमधून धेंडे यांनी जीवनातल्या विसंगतींवर बोट ठेवले आहेच, शिवाय समाजव्यवहारांतील अंतर्विरोधही दाखवून दिला आहे. त्यामुळे या हजलसंग्रहाचा आस्वाद आवर्जून घ्यायलाच हवा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘हजलनामा’ – घनश्याम धेंडे,

गजल सागर प्रतिष्ठान,

पृष्ठे – १६०, मूल्य – १५० रुपये.

चित्रदर्शी तरलकथा

‘पैंजण’ हा मोहना कारखानीस यांचा दुसरा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. याआधी त्यांचा ‘जाईचा मांडव’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला होता. आजूबाजूला घडणाऱ्या घटना, घेतलेले अनुभव त्यांच्या कथांमधून तरलपणे येतात. ‘जाईचा मांडव’मधून हे दिसून आलेच आहे. तीच बाब हा नवा कथासंग्रह वाचतानाही प्रकर्षांने जाणवते.

कथनशैलीतील तरलपणाबरोबरच वास्तववादी चित्रण हेही कारखानीस यांच्या कथांचे वैशिष्टय़ सांगता येईल. त्यामुळेच त्यांची शैली ही चित्रदर्शी झाली आहे. ‘पैंजण’मधील कथा वाचताना याचा प्रत्यय येतो. या संग्रहातील ‘व्हॅलेंटाइन डे’ ही कथा या दृष्टीने पाहता येईल. सतत कामात अत्यंत व्यग्र असलेल्या एक नवरा आणि त्याच्या बायकोच्या मनातील घालमेल या कथेतून चित्रित झाली आहे. तर ‘मॉल’ या कथेमधून कारखानीस यांनी समाजातील आर्थिक विषमतेवर बोट ठेवले आहे. याशिवाय या संग्रहातील कथांमध्ये अनुषंगाने  विनोदनिर्मिती केली आहे. काही वेळा हा विनोद पूर्वसुरींच्या अनुकरणाच्या दिशेने जातो खरा, परंतु त्यामुळे त्यातील रंजकता कमी होत नाही.

‘पैंजण’- मोहना कारखानीस,

डिंपल पब्लिकेशन,

पृष्ठे – १९२, मूल्य – २१० रुपये.

मराठीतील सर्व दखल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest marathi books available in market