एखाद्या काल्पनिक कथेच्या नायकासारखा सर्वगुणसंपन्न, अत्यंत रूपवान, सर्वांना वेध लावणारा सिद्धार्थ… त्यातून राजकुमार- भावी राजा! असे असूनही तत्त्वांसाठी, मानवजातीला दु:खमुक्त करण्यासाठी सर्वसंगपरित्याग करतो, लोकांच्या मनावर राज्य करतो, शेकडो वर्षं त्याचं तत्त्वज्ञान अंगिकारलं जातं. हा जीवनपटच वाचकाला आकर्षून घेणारा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या शेकडो वर्षांच्या काळात बुद्धांवर ललित, गंभीर, तत्त्वज्ञानात्मक साहित्य विपुल प्रमाणात लिहिलं गेलं आहे. बुद्धाचे चिंतन, आयुष्याचा अनुभव, त्यांना झालेली समग्र वास्तव जीवनाची जाणीव, यातूनच बुद्धांचा प्रतीत्यसमुत्पाद हा सिद्धान्त दिसून येतो. त्यातूनच लेखक नरेंद्र शेलार यांना ‘महाकारुणिक’ कादंबरीचे सूत्र सापडले. त्यातील वैचारिक संघर्ष लेखनाचा विषय होऊ शकतो हे जाणवले.

सिद्धार्थची घडण कशी झाली, वैचारिक पातळीवर त्यांच्या मनात काय घडामोडी होत होत्या, त्या वेळी आजूबाजूचा सामाजिक, आर्थिक, आध्यात्मिक परिसर कसा होता, वर्णव्यवस्था, धार्मिक समजुती, यज्ञसंस्था यांचा त्यांच्यावर काय परिणाम होत होता? ‘तथागत’ बनण्यापर्यंतचा सिद्धार्थचा प्रवास कसा होता? त्यांनी शारीरिक कष्ट कसे सोसले. या पदापर्यंत येताना त्यांच्यात वैचारिक बदल कसा झाला. बुद्धांची महानता सर्वांना माहिती असतेच, पण ‘सिद्धार्थ’ असतानाही एक सर्वसामान्य राजपुत्र, एक माणूस, एक युवक म्हणून त्याचं जगणं कसं होतं? त्याचा संघर्ष कोणाशी होता? कोणता होता? आणि त्याला काय साध्य करायचं होतं याचं चित्रण या कादंबरीत येतं. सिद्धार्थाच्या संन्यास ग्रहणामागे ना मोक्षप्राप्तीची इच्छा होती ना स्वर्गप्राप्तीची आकांक्षा! क्रोध, संतापही नव्हता. त्याला युद्ध नको होते, त्याला समष्टीचे दु:ख जाणवत होते, समस्त मानव जातीबद्दल वाटणारी करुणा, मैत्री, शील किंवा नैतिकतेची काळजी होती. शक्य आणि कोलाय वंशाचा नाश त्याला डोळ्यांसमोर दिसत होता.

हेही वाचा : निमित्त : चेरीचा बहर आणि कवी

जग सुखाच्या शोधात असताना सिद्धार्थ मात्र दु:खाच्या रहस्याचा शोध घेतो. कलहाचा अंत आणि शांततेची प्रतिष्ठापना हे त्याचे ध्येय आहे. तपस्या, समाधी, इ. इतर मार्ग जर काहींना परिपूर्ण वाटत असतील तर समस्त मानवजातीच्या कल्याणाचा प्रश्न अनुत्तरित का आहे? पारंपरिक ज्ञानाने हे उत्तर सापडलं तर उत्तम, नाहीतर नव्या मार्गाचा शोध घ्यायचा आहे. स्वत:चा मार्ग स्वत:लाच शोधायचा आहे. त्यासाठी ज्ञानाची कसोटी लावायची आहे. संघर्ष हे सर्व दु:खांचे मूळ असेल तर त्या दु:खाचे विज्ञान त्याला नव्याने शोधायचे आहे. अशा सर्व विचारांचे काहूर मनात उठत असले तरी तोपर्यंत त्याच सर्व शाखांचं वेद इ.चं अध्यापन झालेलं आहे. पण प्रस्थापित सर्व सिद्धान्तांचं ज्ञानभांडारही त्याला पाहायचं आहे. भृगुऋषी, आलार कलाम, भारद्वाज ऋषींकडून त्यांनी ज्ञान घेतले. विविध संप्रदायांनी जोपासलेल्या ज्ञानपरंपरांचे तुलनात्मक अध्ययन केले. सत्याच्या शोधात निघालेल्या सिद्धार्थला अनेक संकटांशी सामना करावा लागला; तपश्चर्या केली. तेव्हा त्या ज्ञानाच्या मर्यादा त्याला समजल्या.

… सिद्धार्थ गौतम आता ‘सम्यक संबुद्ध झाला.’ हा साक्षात्कार दैवी चमत्कार नव्हता तर त्याच्या ७ वर्षे शारीरिक – मानसिक क्लेशांनी केलेल्या तपस्येला, निरीक्षण, मनन – चिंतन – विचारमंथनला मिळालेलं उत्तर होतं, हे या कादंबरीतून जाणवतं.

हेही वाचा : आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : गोष्ट सांगण्याची कला…

बुद्ध झाल्यानंतर कथा भूतकाळात मागे जाऊन सिद्धार्थाच्या जन्मक्षणापाशी येते. महामायेला पडलेल्या स्वप्नाप्रमाणेच अतिशय आकर्षक फूल – फळांनी बहरून आलेले, सर्वत्र भरून राहिलेला सुगंध अपारआनंद असलेल्या लुंबिनी वनातच सिद्धार्थचा जन्म होतो. आईच्या मृत्यूनंतर त्याचा सांभाळ प्रजापती गौतमी प्रेमाने करते. राजा शुद्धोदन त्याच्यासाठी नवा राजप्रासाद विलास उपभोग घ्यावा, संन्यास मार्गाकडे वळू नये म्हणून बांधतात. त्याचबरोबर राजकुमार म्हणून क्षत्रियांचेही संस्कार केले जातात. त्या त्या सर्व विद्योत तो पारंगत होतो. तो लौकिकात रमावा म्हणून देखण्या गोपाशी त्याचा विवाह करतात. तिचंही मन त्याच्यावर जडलेलं आहे. त्यांच्या वैवाहिक आयुष्यात चर्चा, विचारविनिमयाला स्थान आहे. तिच्या विचारांना तो नवी दिशा देतो. त्याच्या विचारात, शब्दात जगण्याची प्राणवंत ऊर्जा आहे याची तिला जाणीव होते. तो घर सोडून परि व्राजक म्हणून जाताच तीही आभूषणांचा त्याग करून महालातच संन्यस्त जीवन जगत राहुलचे संगोपन करते. पण पुढे ती आणि प्रजापती गौतमी (आई) पुढचे संपूर्ण आयुष्य धम्मयात्रा करीत बुद्ध विचारांचा प्रसार करतात. राजा शुद्धोदन सिद्धार्थाच्या संन्यस्त वृत्तीमुळे आधी कष्टी झालेला असला तरी आपला मुलगा फक्त एका राज्यावर नाही तर लोकांच्या मनावर राज्य करतोय, राजे, महाराजे, श्रेष्ठी, चित्रलेखा असे सर्व थरांतील अनुयायी शिष्य त्याला मिळताहेत, अत्युच्च कोटीचा सन्मान त्याला मिळतोय, त्याचं सर्वत्र प्रेमाने स्वागत होत आहे हे पाहून राजा शुद्धोदन कृतार्थ होतो. असा सर्व जीवनपट येतो. पण त्यात सिद्धार्थच्या वैचारिक बुद्धिप्रामाण्यवादी भूमिकेला प्राधान्य आहे. सामान्यांपासून तपस्व्यांपर्यंत साधलेला संवाद, समर्पक युक्तिवाद, अतिशय विनम्रतेने केलेले खंडन, मंडन, अश्वलायनसारख्या विद्वान ब्राह्मणाचे त्यांनी केलेले मतपरिवर्तन मुळातूनच वाचण्यासारखे आहे.

हेही वाचा : वर्तन कारणांचे उत्खनन

खरं तर गौतम बुद्धांची व्यक्तिरेखा उत्तुंग महापुरुष अशी आहे आणि तशीच ती यातही आहे; पण युवराज सिद्धार्थ माणूस म्हणूनही गुणसंपन्न आहे हे कोरीवपणे रेखाटले आहे. छन्न महामाया, प्रजापती, शुद्धोदन, देवदत्त अशा इतर व्यक्तिरेखाही स्पष्टपणे चित्रित केल्या आहेत.

‘महाकारुणिक’, – नरेन्द्र शेलार, राजहंस प्रकाशन, पाने- २८७, किंमत- ३५० रुपये.
meenagurjar1945@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautam buddha samyak life journey css