विनील भुर्के

आजची विज्ञानकथा ही उद्याची सामाजिक कथा असते असं म्हणतात. याचं कारण आजचं विज्ञान हे उद्या तंत्रज्ञानाच्या रूपात आपल्या आयुष्याचा भाग होणार असतं. तंत्रज्ञानाचा स्वीकार तुलनेने सहजपणे होत असला, तरी त्या तंत्रज्ञानाच्या मागचं विज्ञान समजून घ्यायचं असेल तर मात्र वैज्ञानिक संशोधन, त्यामध्ये वापरली जाणारी वैज्ञानिक पद्धत आणि त्यासाठी करावी लागणारी वैचारिक मांडणी या संपूर्ण कार्यपद्धतीचा आवाका समजून घ्यावा लागतो. ‘(दु)र्वर्तनाचा वेध’ हे पुस्तक मेंदुविज्ञान या अत्यंत उत्कंठावर्धक परंतु सर्वसामान्य माणसांच्या समजुतीच्या काहीशा पलीकडे असलेल्या वैज्ञानिक विषयावरील लेखांचा संग्रह आहे.

Loksatta kutuhal Artificial intelligence and health research
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आरोग्यविषयक संशोधन
Manusmriti Capitalism Text Dr Babasaheb Ambedkar
‘मनुस्मृती’च्या निमित्ताने…
Dementia, Health, Dementia types,
Health Special: स्मृतिभ्रंश – प्रकार कसे ओळखावे?
bold novel on an uncommon subject dubhangalel jivan
अचर्चित विषयावरची धाडसी कादंबरी
Bhadra Mahapurush Rajayoga will be created by Mercury transit in June
बँक बॅलन्स होणार दुप्पट; जूनमध्ये बुध ग्रहाच्या राशीपरिवर्तनाने निर्माण होणार ‘भद्र महापुरुष राजयोग’, ‘या’ तीन राशींची चांदी
Loksatta kutuhal Cyber Crime and Artificial Intelligence
कुतूहल: सायबर गुन्हे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता
article about mpsc exam preparation
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – सामान्य विज्ञान प्रश्न विश्लेषण
Navpancham Yog
सुर्य आणि केतुने निर्माण केला दुर्मिळ राजयोग! या राशींच्या लोकांचे नशीब चमकणार; वैवाहिक जीवनात आनंदी आनंद

पुस्तकाचं शीर्षक दुर्वर्तनाचा उल्लेख करतं; परंतु त्यातील ‘दु’ कंसात आहे, त्यामुळे वाईट वागणुकीव्यतिरिक्त मानवी वर्तणुकीचे इतर अनेकविध पैलूसुद्धा ते उलगडून दाखवतं. वाईट वर्तनामध्ये खोटं बोलणं, लबाडी करणं इथपासून दहशतवादी बनणं इथपर्यंतचे सर्व प्रकार तर यात आहेतच, पण त्याचबरोबर परोपकार करणं, सर्जनशील असणं, संगीत ऐकणं यासारख्या माणसाच्या चांगल्या वर्तनाची फोड करून सांगणारे लेखसुद्धा यात आहेत. तसेच चांगल्या किंवा वाईट वर्तनात मोडत नाहीत असे, म्हणजे – स्त्री आणि पुरुष यांच्या वागण्यात फरक का असतो, आपल्या काही आठवणी साफ चुकीच्या का असतात – असे आपल्याला कोड्यात टाकणारे विषयदेखील यात आहेत.

हेही वाचा : स्थितप्रज्ञ वैज्ञानिक

हे लेख गेल्या दशकभरात वेगवेगळ्या दिवाळी अंकांमध्ये प्रसिद्ध झालेले असले तरी लेखकाने ते पुस्तकरूपात आणताना त्या त्या क्षेत्रात झालेल्या संशोधनाची अद्यायावत माहिती लक्षात घेऊन त्या त्या लेखात आवश्यक त्या सुधारणा केल्या आहेत. त्यामुळे मेंदुविज्ञान विषयावरील चांगल्या संदर्भग्रंथाचं मूल्य या पुस्तकाला लाभलं आहे. असं असलं तरी पुस्तक सर्वसामान्य वाचकालाही बोजड वाटणार नाही, कारण वैज्ञानिक लिखाणात सहसा आढळणारे किचकट तांत्रिक शब्द, तांत्रिक आकृत्या आणि संदर्भसूची देण्याचं लेखकाने जाणीवपूर्वक टाळलं आहे. त्यामुळेच मेंदुविज्ञानासारख्या किचकट वाटणाऱ्या विषयातील संशोधन – जे प्रामुख्याने पाश्चात्त्य जगात मोठ्या प्रमाणावर होतं – ते त्यातील शास्त्रीय संकल्पना, संशोधनात वापरलेल्या पद्धती, केलेले प्रयोग, केलेली निरीक्षणं, त्यातून काढलेले निष्कर्ष सर्वसामान्य वाचकाला समजेल अशी उदाहरणं देऊन आणि भारतीय परिस्थितीमधील साम्यस्थळं दाखवून देत सोप्या भाषेत समजावून दिल्यामुळे सहजपणे वाचता येतं आणि समजतं.

सुबोध जावडेकर स्वत: विज्ञानकथा आणि विज्ञानविषयक लेखन करणारे लेखक असले तरीही या प्रकारच्या प्रत्यक्ष वैज्ञानिक संशोधनाचा आढावा घेणाऱ्या लेखांमध्ये जे एक वेगळं आव्हान असतं- विज्ञानकथेसारखं खिळवून ठेवणारं कथानक नसतं, कल्पनेची भरारी मारता येत नाही, वाचकाला आवडणारी हाडामांसाची व्यक्तिमत्त्वं उभी करता येत नाहीत, तरीही ते लिखाण वाचनीय करायचं असतं- ते आव्हान लेखकाने लीलया पेललं आहे. एखाद्या वैज्ञानिक प्रयोगाची इत्थंभूत माहिती दिल्यानंतर त्यावर ते आपल्या नर्मविनोदी शैलीत एखादी टिप्पणी करतात त्यामुळे तो विषय अधिकच जवळचा वाटू लागतो.

हेही वाचा : पदार्थ विज्ञानातील जादूगार…

वैज्ञानिक पद्धत (Scientific method) ही तर्कावर आधारित असलेली एक प्रणाली आहे. एखादी वैज्ञानिक समस्या सोडवण्यासाठी त्या समस्येचं संभाव्य उत्तर काय असू शकेल त्या दिशेने विचार करून त्याचं योग्य असे गृहीतक ( hypothesis) मांडणं, ते सिद्ध करण्यासाठी कोणती निरीक्षणं करावी लागतील ते ठरवणं, त्यासाठी योग्य ते प्रश्न विचारणं, प्रयोगांची रचना (design of experiments) करणं, ते प्रत्यक्षात आणून ती निरीक्षणं अचूकपणे नोंदवून ठेवणं, त्यावर योग्य ती सांख्यिकी प्रक्रिया (statistical analysis) करून उचित उत्तरं मिळवणं, ती मूळ गृहीतकाबरोबर पडताळून बघणं आणि सरतेशेवटी त्या गृहीतकाचा स्वीकार किंवा त्याग ( hypothesis accept or reject) करणं. जर ते गृहीतक स्वीकारलं गेलं तर अन्य शास्त्रज्ञांनी तीच प्रक्रिया करून तसेच निष्कर्ष मिळतात की नाही ते तपासणं. ही जटिल प्रक्रिया केल्यानंतरच ते निष्कर्ष वैज्ञानिक सत्य म्हणून मान्य केले जातात. हे सोपं काम नाही.

आता इतके सगळे शास्त्रीय सोपस्कार जेव्हा मेंदुविज्ञानात करायचे असतात, तेव्हा ज्यावर अभ्यास करायचा आहे तो विषय किंवा प्राणी जिवंत असताना त्याच्या मेंदूमध्ये डोकावून बघणं तेही त्याला इजा न करता, किंवा त्याचं वर्तन बदलू न देता, हे तर अतिशय नाजूक आणि चिकाटीचं काम आहे. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रायोगिक पद्धतीसुद्धा अतिशय कौशल्याने तयार कराव्या लागतात. लेखक वाचकाला या बाबतीत वेळोवेळी जागरूक करत राहतो. त्यामुळे असं शास्त्रीय संशोधन किती गुंतागुंतीचं असतं हेही लक्षात येतं. सर्वसाधारणपणे आपल्या वाचनात येणारं छद्मा-विज्ञान (pseudo- science) मात्र यापैकी काहीच करायला बांधील नसतं. कारण तिथं ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ असा मामला असतो. आपल्याला हवा तो दृश्य परिणाम दाखवणारे पुरावे गोळा करायचे किंवा चक्क तयार करायचे आणि आपल्याला हव्या त्या बाबा, बुवा किंवा धर्म इत्यादीचं समर्थन देत सगळं काही अगदी शास्त्रीय असल्याचं भासवायचं असा प्रकार असतो. जावडेकर जसे आपल्या लेखनात नर्मविनोद करत असतात तसेच अशा अनिष्ट प्रकारांच्या वर्मावर बोटसुद्धा ठेवतात. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि वैज्ञानिक पद्धत यांचं समाजाच्या आरोग्यात असलेलं महत्त्व अधोरेखित करतात.

हेही वाचा : आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण

वाचता वाचता लक्षात येतं की यात नमूद केलेले सर्वच विषय भारतासह जिथं जिथं मनुष्यप्राणी आहे त्या जगातील कुठल्याही ठिकाणी विशेषत: जिथं जिथं मनुष्य मोठ्या समाजाच्या स्वरूपात राहतो तिथं तिथं अगदी सहजपणे घडणाऱ्या घटनांशी संबंधित आहेत. त्यामधून वाचकाला काही प्रश्न पडू लागतात. माणसामाणसांतील परस्परसंबंध कसे घडत किंवा बिघडत जातात, माणूस जसं वागतो त्यापैकी त्याच्या इच्छेचा/ निवडीचा भाग किती असतो आणि त्याच्या जनुकीय रचनेचा भाग किती असतो? माणसाच्या चांगल्या किंवा वाईट वागण्यात जर जनुकांचा मोठा वाटा असेल तर त्यातून निर्माण होणाऱ्या चांगल्या किंवा वाईट परिणामांसाठी त्याला जबाबदार धरता येईल का? मेंदूचं संशोधन करून माणसाचं वर्तन बदलता येईल का? बदलता आलं तर तसं करणं नैतिकदृष्ट्या योग्य असेल का? भारतीय वाचकांना असाही प्रश्न नक्कीच पडेल की असं संशोधन फक्त परदेशात होतं का? भारतात होत नाही का? नसेल तर का होत नाही?

या आणि अशा काही प्रश्नांची उकल पुस्तक वाचताना आपल्याला होते आणि काही प्रश्न अनुत्तरित राहतात. परंतु अशा प्रत्येक प्रश्नाचं तयार उत्तर पुरवणं हा इथं उद्देश नाही. मेंदुविज्ञान या एका अत्यंत रोचक आणि वैज्ञानिकदृष्ट्या आव्हानात्मक विषयाची सोप्या भाषेत ओळख करून देणं आणि त्याबद्दल विचार करायला, प्रश्न विचारायला प्रवृत्त करणं हे उद्देश यामागे दिसतात. ज्या वाचकांना अधिक जाणून घ्यायचं असेल त्यांच्यासाठी प्रत्येक लेखात महत्त्वाचे संदर्भ आणि संबंधित शास्त्रज्ञाचं नाव आवर्जून नमूद केलेलं आहे.

हेही वाचा : निमित्त : समर्पित समाजसुधारक

विज्ञान विषयात विशेष रुची असलेल्या वाचकांना तर हे पुस्तक आवडेलच; परंतु विज्ञानविषयक वाचनाची फारशी आवड किंवा सवय नसलेल्या परंतु मानवी वर्तनाबद्दल ज्यांना सामान्य जिज्ञासा आहे अशा सर्वच वाचकांना हे पुस्तक वाचनीय वाटेल. रविमुकुल यांनी तयार केलेलं मुखपृष्ठ पुस्तकाच्या विषयाचा वेध घेणारं आणि उत्सुकता निर्माण करणारं आहे.

(दु)र्वर्तनाचा वेध, सुबोध जावडेकर, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, पाने- २५२ किंमत- ३०० रुपये