महाराष्ट्रासह देशात करोना महामारीने कहर केला आहे. अशा परिस्थितीत समाज या गोष्टी गांभीर्याने घेणार की अभिनेता सुशांत सिंह याच्या आत्महत्या प्रकरणाची चर्चा करीत राहणार? असा उद्विग्न सवाल महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी उपस्थित केला आहे.

मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे की, करोना विषाणूने गेली पाच महिने थैमान घातले असून अद्याप हा धोका कधी जाणार याची खात्री नाही. जिल्ह्याचे प्रमुख अधिकाऱ्याचा एखादा फोन आला की पोटात धस्स होते. या सर्वांवर कमालीचा तणाव आहे. मात्र दुसरीकडे दोन आठवडे फक्त एक अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या विषयीच चर्चा होताना दिसते. याबाबत चौकशी होईल, त्यासाठी मुंबई पोलीस सक्षम आहेत.

अमृता फडणवीस यांचे वक्तव्य आश्चर्यजनक –

करोना महामारीबाबत साधे एक अवाक्षरही न काढणाऱ्या अमृता फडणवीस अवतरतात. एका आत्महत्या तपासावरुन मुंबई सुरक्षित राहिली नाही, असे वक्तव्य त्या करतात. हे आश्चर्यजनक आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची वक्तव्ये, आदित्य ठाकरे यांना रेशमी किडा संबोधणे व आता मुंबई पोलिसावर दाखविलेला अविश्वास, हे सर्व वाचून करोनाच्या संकटामध्ये नेमके हे चाललंय तरी काय? हेच समजत नाही, असंह मुश्रीफ म्हणाले.