लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोलापूर : पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये म्हणून बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेला दर्शन मंडप आणि ‘स्काय वॉक’चा प्रश्न जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून मार्गी लागत आहे. जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या १२९ कोटी रुपयांच्या आराखड्यापैकी राज्याच्या मुख्य सचिव सुनीता सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने ११० कोटी रुपये खर्चाचा आराखडा मंजूर केला आहे.

येत्या सप्टेंबर मध्यापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राज्य शिखर समितीच्या बैठकीत हा आराखडा अंतिम होऊन शासन निर्णय निघेल, अशी अपेक्षा आहे. पंढरपुरात दरवर्षी आषाढी व कार्तिकीसह माघी आणि चैत्री वारीला लाखो भाविक आणि वारकरी येतात. वर्षभरात एक कोटीहून जास्त भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते. भाविकांची वाढती गर्दी पाहता सध्याची दर्शनरांग व्यवस्था अत्यंत अपुरी आहे. त्यामुळे दर्शन मंडप व स्काय वॉक या माध्यमातून भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्था व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रशासनाने १२९ कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार केला होता.

आणखी वाचा-उद्धव ठाकरे हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत – अंबादास दानवे

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समितीने या आराखड्याला मान्यता दिल्यानंतर हा आराखडा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीत सादर करण्यात आला असता या समितीनेही या आराखड्याला मान्यता दिली होती. त्यानंतर शासनाच्या मुख्य सचिव सुनीता सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीनेही बारकाईने तपासणी करून ११० कोटी खर्चाच्या या आराखड्याला हिरवा कंदील दाखविला आहे. त्या पाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सदस्य असलेल्या राज्य शिखर समितीकडे हा आराखडा सादर केला जाईल. येत्या सप्टेंबर महिन्यात राज्य शिखर समितीकडून या आराखड्यास अंतिम मान्यता मिळेल व त्यानंतर लवकरच शासन निर्णय निघेल, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

आणखी वाचा-सांगली, मिरजेसह जिल्ह्यात बाह्य रुग्ण सेवा बंद

दर्शन रांगेतील सुविधा

दर्शन रांगेत भाविकांसाठी पिण्याचे शुद्ध पाणी, शौचालयाची सुविधा, प्रतीक्षालय, दर्शनासाठी टोकन घेण्याची सुविधा, रिफ्रेशमेंट, आपत्तीजनक स्थितीत सुरक्षितपणे बाहेर पडण्याची व्यवस्था, हिरकणी कक्ष, दिव्यांगासाठी सुविधा, अग्निप्रतिबंधक सुविधा, पोलीस सुरक्षा, जेवण व्यवस्था, वाहनतळ या बाबींचा समावेश आराखड्यात करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 110 crore plan approved for sky walk with pandharpur darshan pavilion mrj