आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पा अंतर्गत रायगड जिल्ह्य़ात ४०० कोटी रुपयांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. जागतिक बँक आणि केंद्र सरकारच्या अर्थसहाय्यातून ही कामे केली जाणार आहेत. यात प्रामुख्याने चक्रीवादळ निवारा केंद्र, खारबंदीस्तीची कामे आणि भुमिगत विद्युतवाहिन्यांच्या कामांचा समावेश आहे.

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प राज्याच्या पश्चिम समुदकिनारपट्टीवरील जिल्ह्य़ांमध्ये राबविण्यात येणार आहे. यात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांचा समावेश आहे. आपत्कालिन परिस्थितीत लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करता यावे, जेणेकरून जिवीत हानीचे प्रमाण कमी होऊ शकेल. हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. या प्रकल्पाला जागतिक बँकेने अर्थसहाय्य करण्याचे मान्य केले आहे. या कार्यक्रमाअंतर्गत रायगड जिल्ह्य़ात तब्बल चारशे कोटी रुपयांची काम प्रस्तावित करण्यात आली असून बहुतांश प्रकल्पांना मान्यता प्राप्त झाली आहे.

सदर प्रकल्पांतर्गत किहीम आणि श्रीवर्धन येथे सुसज्ज चक्रीवादळ निवारा केंद्र बांधण्यात येणार आहे. या निवारा केंद्रात एकाच वेळी एक ते दिड हजार लोकांची राहायची व्यवस्था होऊ शकणार आहे. निवारा केंद्रासाठी जागा निश्चिती झाली असून लवकरच दोन्ही ठिकाणी बांधकामांना सुरुवात होण्याची शक्यता आहे.

वादळी परिस्थीतीमुळे किनारपट्टीवरील गावांचे नुकसान होऊ नये यासाठी जिल्ह्य़ात ४५ किलोमिटर लांबीच्या खारबंदीस्तीच्या कामांना या प्रकल्पाअंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे. जुन्या आणि जिर्ण झालेल्या खारबंदीस्तीचे सक्षमीकरण (उंची आणि रुंदी वाढवणे) या माध्यमातून केले जाणार आहे. यात अलिबाग, पेण, मुरुड तालुक्यातील सहा खारभुमी बंधाऱ्यांचा समावेश आहे. सध्या हे काम निविदा स्तरावर आहे.

अलिबाग शहरातील विद्युतवाहिन्या भुमिगत करण्याच्या कामाला या प्रकल्पाअंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे. यानुसार अलिबाग शहर आणि आसपासच्या गावातील सर्व विद्युतवाहिन्या जमिनीखालून टाकल्या जाणार आहे. जेणेकरून आपत्कालिन परिस्थितीत विद्युतपुरवठा सुरळीत राहण्यास मदत होणार आहे. हे काम देखील सध्या निविदा स्तरावर आहे.

या सर्व प्रकल्पांना जागतिक बँकेकडून अर्थसाहाय्य प्राप्त होणार आहे. जिल्ह्य़तील बहुतांश कामांना मान्यता प्राप्त झाली आहे. जागतिक बँक ेच्या प्रतिनिधींनी जागांची पाहणी पुर्ण केली आहे. निविदा प्रक्रि या पुर्ण झाल्यावर येत्या महिन्याभरात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकेल. असा विश्वास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी व्यक्त केला.

काय आहे प्रकल्प?

समुद्र किनाऱ्यावरील गावांचे चक्रीवादळांसारख्या नसíगक आपत्तीपासून संरक्षण व्हावे, या आपत्तीपासून उद्भवणाऱ्या जिवीत व वित्तहानीचे प्रमाण कमी व्हावे. हा या राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पाचा मुळ उद्देश आहे. रायगड जिल्ह्य़ात ४०० कोटी रुपयांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

कोणत्या कामांचा समावेश?

या प्रकल्पांतर्गत चक्रीवादळ निवारा केंद्र बांधणे, खार प्रतिबंध बंधारे बांधणे, जमीन खालून विद्युतवाहिनी टाकणे आणि राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाची स्थापना करणे इत्यादी कामे करण्यात येणार आहेत.  यासाठी जागतिक बँकेकडून प्रकल्पासाठी लागणारा निधी  उपलब्ध होणार होईल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 400 crore works in raigad national hurricane risks prevention project