राज्यातले मंत्री जनतेच्या पैशावर सहलीला जात असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आक्रमक झाले आहेत. आदित्य ठाकरे सातत्याने मंत्री आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या परदेशवाऱ्यांवरून टीका करत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधान परिषदेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या परदेशवाऱ्या रद्द झाल्या आहेत. आम्ही प्रश्न उपस्थित केल्यामुळेच या परदेश सहली रद्द झाल्या आहेत, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्यापाठोपाठ आता आदित्य ठाकरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या परदेशवारीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आदित्य ठाकरे म्हणाले, आमचा कुठेही वैयक्तिक वाद नाही. परंतु, जनतेच्या पैशावर यांनी सहलीला जाऊ नये, असं आमचं म्हणणं आहे. आता उद्योगमंत्री उदय सामंत लंडनला जाणार आहेत. तिथे म्हणे गोलमेज परिषद होणार आहे. परंतु, ही गोलमेज परिषद कोणाबरोबर असणार आहे, या सहलीतून राज्याला किती गुंतवणूक मिळणार आहे, हे राज्यातील जनतेला समजलं पाहिजे.

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे म्हणाले, उद्योगमंत्री तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉन्फरन्समध्ये जाऊन चर्चा करणार आहेत, असं सांगण्यात आलं आहे. परंतु, इथे सरकारच आर्टिफिशियल (कृत्रिम) आहे. त्यानतर परदेश दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी उदय सामंत दाव्होसला जाऊन पाहणी करणार आहेत. ज्या दाव्होसमध्ये जानेवारीपर्यंत वर्ल्ड इकोनॉमिक फोरमचे लोक येत नाहीत, तिथे हे स्वतः जाऊन कसली पाहणी करणार आहेत? तिथे हे काय ट्रॅफिकचे कोन लावायला जाणार आहेत का? यांनी पालकमंत्री म्हणून आपल्या जिल्ह्यात पाहणी करावी.

हे ही वाचा >> सूर्याच्या दिशेने झेपावणाऱ्या Aditya-L1 बाबत मोठी अपडेट, ISRO चा दुसऱ्यांदा मोठा पराक्रम, एका महिन्यात ‘इतकं’ अंतर पार

आमदार आदित्य ठाकरे म्हणाले, खारघरमध्ये जी दुर्दैवी घटना घडली, त्याची यांनी काय पाहणी केली ते आपल्याला माहितीच आहे. त्या घटनेचा अहवाल अद्याप आलेला नाही. दाव्होसनंतर हे (उदय सामंत) म्युनिकला जाणार आहेत. आमचा मुद्दा हाच आहे की जनतेच्या पैशावर यांनी सहली करू नयेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aaditya thackeray slams uday samant foreign tour says why you going davos where no one goes until january asc