शिवसेनेसाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या नामांतरांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर, तर उस्मानाबादचे नाव धाराशीव करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. याचे पडसाद विधानसभेच्या दोन दिवसीय अधिवेशात उमटले. विधानसभा अध्यक्ष म्हणून भाजपाच्या राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी अभिनंदनपर भाषण करताना उद्धव ठाकरेंवर टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“जाता जाता उद्धव ठाकरेंनी औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलून टाकले. देशाचा महाराष्ट्राचा विकास होत असले तर मला काही आक्षेप नाही. शहरांची नावं बदलून काय संदेश देणार आहात? मुस्लिमांची नावं बदलून काय संदेश दिला जात आहे. बाळासाहेबांच्या नावे मोठी शहरं बनवा, आम्ही टाळ्या वाजवून स्वागत करु. पण मुस्लिमांची नावे बदलून काय म्हणायचे आहे?,” असा सवाल अबू आझमींनी केला.

औरंगजेब अतिरेकी होता – भास्कर जाधव</strong>

यावर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी आक्षेप घेत प्रत्युत्तर दिले आहे. “औरंगजेब अतिरेकी होता, त्याने आमच्यावर अत्याचार केला म्हणून नाव बदलून संभाजी महाराजांचं नाव दिलं आहे. मुस्लिम आणि हिंदू असा भेदभाव नाही इतकंच सांगायचं आहे,” असं भास्कर जाधव म्हणाले.

दरम्यान, औरंगाबाद विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने यापूर्वीच केला. मात्र, केंद्र सरकारने त्यास अजूनही मंजुरी दिलेली नाही. आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेला हिंदुत्ववादी प्रतिमेसाठी नामांतराचा विषय महत्त्वाचा होता. या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाकडून औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशीव करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात आला होता आणि तो मंजूरही झाला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abu azmi attacks uddhav thackeray after renaming aurangabad osmanabad abn