मागील दोन आठवड्यात महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय उलथापालथीनंतर अखेर महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. शिवसेनेच्या ३९ आमदरांनी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात बंडखोरी केल्याने आता शिवसेनची एकप्रकारे अस्तित्वाची लढाई सुरू झालेली आहे. एकीकडे या राजकीय घडामोडी घडत असताना दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता पक्ष बांधणीसाठी कंबर कसल्याचे दिसत आहे. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी राज्यभरातील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी महासंपर्क अभियान सुरू केले असून, आता त्यांनी कोकणाकडे आपला मोर्चा वळवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई, ठाण्यापाठोपाठ कोकणातही शिवसेनेची मोठी ताकद होती. मात्र, रत्नागिरीचे आमदार उदय सामंत, सिंधुदुर्गातील सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर, रायगडमधील महाडचे आमदार भरतशेठ गोगावले, रत्नागिरीतील दापोलीचे आमदार योगेश रामदास कदम हे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात बंडखोर आमदारांच्या गटात गेल्याने, आता शिवसेनेची कोकणावरील पकड कमकुवत झाल्याचे दिसत आहे. अशावेळी अमित ठाकरेंनी कोकणात मनसेच्या वाढीसाठी नियोजन केल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी १५ दिवसांत मुंबईतील ३६ विधानसभा मध्ये हजारो विद्यार्थ्याशी संवाद साधला आणि त्यानंतर नवीन नेमणुका जाहीर केल्या. यानंतर अमित ठाकरे आता ५ जुलै ते ११ जुलै असा सात दिवसांचा कोकण दौरा करणार आहेत. या दौऱ्यात सिंधुदुर्गात दोन दिवस (५,६), रत्नागिरीत दोन दिवस (७,८) आणि रायगडमध्ये तीन दिवस (९,१०,११ जुलै) असे एकूण सात दिवस अमित ठाकरे तालुका तसंच गाव पातळीवरील स्थानिक मनसे पदाधिकारी तसंच मनविसे पदाधिकारी आणि महाविद्यालयीन तरुण तरुणी यांच्याशी संवाद साधणार आहेत.

मनविसे ही महाराष्ट्रातील सर्वात प्रबळ आणि प्रभावी विद्यार्थी संघटना बनवण्याचा निर्धार अमित ठाकरे यांनी मुंबईतील प्रत्येक बैठकीत व्यक्त केला होता. मुंबईत अमित ठाकरे यांच्या मनविसे पुनर्बांधणी संपर्क अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: As shiv senas battle for survival continues mns launches statewide maha sampark abhiyan msr