शेतकरी, शेतमजूर, वंचित घटकांच्‍या विविध मागण्‍यांसाठी प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्‍वात बुधवारी अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. बच्चू कडू स्वतः सत्तेत सहभागी असूनही त्यांनी आपल्याच सरकारविरोधात भूमिका घेतली आहे. बच्चू कडू यांनी सरकारविरोधात हा मोर्चा काढल्‍यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. अमरावतीतल्या संत गाडगेबाबा यांच्‍या समाधीस्‍थळापासून दुपारी मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चात मोठ्या संख्‍येने प्रहारचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. गाडगेनगर, इर्विन चौक मार्गे हा मोर्चा विभागीय आयुक्‍त कार्यालयावर पोहोचला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बच्चू कडू यावेळी म्हणाले, आमची कुणाशी युती नाही झाली तरी आम्हाला त्याची परवा नाही. परंतु, मजूर, शेतकरी आणि वंचितांशी आम्हाला युती करायची आहे. ही केवळ सुरुवात आहे. आज आम्ही फक्त निवेदन देणार आहोत, कारण सरकार आपलं आहे. माझा एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास आहे. कारण हा गरिबांचा माणूस आहे. त्याच विश्वासाने आम्ही आज परत जात आहोत. यानंतर आम्ही तीन महिने वाट पाहू. तीन महिन्यात आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही अधिक आक्रमक भूमिका घेऊ.

आमदार बच्चू कडू म्हणाले, आम्हाला लोकांमध्ये जनजागृती आणि नवीन चळवळ निर्माण करायची आहे. आम्ही धर्म किंवा जातीवर लढणारे लोक नाही. खरंतर मुद्द्यांवर लढलं पाहिजे. मुद्यांवर सरकारबरोबर राहिलं पाहिजे. आंदोलनाद्वारे केलेला हा वार सरकारवरच आहे, परंतु, थोडा सौम्य वार आहे. आज ९ ऑगस्ट म्हणजेच क्रांती दिन आहे. आजच्या दिवशी राज्यात क्रांती घडली पाहिजे. यासाठीच हे जनआंदोलन करत आहोत.

हे ही वाचा >> “राहुल गांधींचे आक्षेपार्ह हावभाव…”, ‘त्या’ कृतीवर एनडीएच्या महिला खासदारांची टीका

प्रहारच्या मागण्या काय?

शेतीची पेरणी ते कापणीपर्यंतची कामे रोजगार हमी योजनेतून व्हावीत, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना महात्‍मा फुले प्रोत्‍साहन अनुदान योजनेअंतर्गत ५० हजार रुपये अनुदान जाहीर करण्‍यात आले होते, पणअजूनही शेतकऱ्यांना त्‍याचा लाभ मिळाला नाही. त्‍यामुळे तो तत्‍काळ मिळावा, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत नुकसानभरपाई मिळावी, वन्‍य प्राण्‍यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान, जीवितहानी यासाठी नुकसानभरपाई मिळावी, वन्‍य प्राण्‍यांचा बंदोबस्त करावा, प्रकल्‍पग्रस्‍तांना २५ लाख रुपये अनुदान दिलं जावं, २० लाख रुपये बिनव्‍याजी कर्ज अथवा कुटुंबातील एका सदस्‍याला शासकीय नोकरी द्यावी, कंत्राटी कामगारांसाठी महामंडळ स्थापन करावे यासह विविध मागण्यांसाठी हा एल्गार मोर्चा काढण्यात आल्‍याचे बच्चू कडू यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bachchu kadu attacks shinde fadnavis govt in jan elgar march amravati asc