गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या वादावर अखेर शुक्रवारी संध्याकाळी राज्य सरकारने पडदा टाकला. ४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयापाठोपाठ राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे देखील उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. घटस्थापनेच्या दिवसापासून म्हणजेच ७ ऑक्टोबरपासून प्रार्थनास्थळे भाविकांसाठी खुली होणार असून त्यासाठी नियमावली देखील राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. मात्र, यावरून आता विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून टीका करण्यता येत आहे. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत “फार मोठं काही केल्याचा टेंभा मिरवू नका”, असं म्हटलं आहे.
प्रसादवाटप, भाविकांची संख्या आणि दुकानदारांसाठी नियम..जाणून घ्या प्रार्थनास्थळांसाठीची नवी नियमावली!
आशिष शेलार यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवरून हे ट्वीट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचा समाचार घेतला आहे. “मंदिरं आणि रंगमंदिरं उघडायला परवानगी दिली म्हणजे मोठं काहीतरी केल्याचा टेंभा मिरवू नका. गेल्या दीड वर्षात लोककलावंत. रंगकर्मी, बॅकस्टेज कलाकार, तंत्रज्ञ यांच्यावर उपासमारीची वेळ आणलीत. मंदिराजवळ अगरबत्ती, धूप-कापूर, प्रसाद विकणाऱ्यांचे हालहाल केलेत त्याचं काय?” असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.
मंदिऱ आणि रंग मंदिरं उघडायला परवानगी दिली म्हणजे मोठं काही तरी केल्याचा टेंभा मिरवू नका…गेली दिड वर्षात लोककलावंत, रंगकर्मी, बँकस्टेज कलाकार, तंत्रज्ञ, यांच्यावर उपासमारीची वेळ आणलीत…मंदिराजवळील अगरबत्ती, धुप-कापूर, प्रसाद विकणाऱ्यांचे हालहाल केलेत त्याचे काय?
1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 25, 2021
…म्हणून प्रार्थनास्थळं उघडण्याचा निर्णय घेतला!
दरम्यान, “रंगमंदिरं आणि प्रार्थनास्थळं यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांचा आणि भाजपाचा रेटा वाढला, म्हणून हा निर्णय घ्यावा लागला. देवाची आणि भक्तांची, नाटक-सिनेमा प्रेमी आणि रंगदेवतेची ताटातूट केलीत. कोकणात चिपीला जाताय, तर रवळनाथासमोर हात जोडून माफी मागा. रंगदेवतेची सेवा करणाऱ्यांना नुकसान भरपाई द्या. ती मिळायलाच हवी”, अशी मागणी देखील आशिष शेलार यांनी केली आहे.
या सगळ्यांचा आणि भाजपाचा रेटा वाढला म्हणून आज निर्णय घ्यावा लागला..
देवाची आणि भक्तांची.. नाटक, सिनेमा प्रेमी आणि रंगदेवतेची ताटातूट केलीत…
कोकणात "चिपीला" जाताय तर रवळनाथासमोर हातजोडून माफी मागा…रंगदेवतेची सेवा करणाऱ्यांना नुकसान भरपाई द्या..ती मिळायलाच हवी!
2/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 25, 2021
राज्यात येत्या ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय झाल्यामुळे लोकांना काहीसा दिलासा मिळालेला असताना त्यापाठोपाठ शुक्रवारी संध्याकाळी उशीरा राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळेही खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, येत्या ७ ऑक्टोबरपासून राज्यभरातील सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळे खुली होणार आहेत. त्यामुळे या मुद्द्यावरून गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभर विरोधकांकडून आणि काही स्थानिक संस्थांकडून होणारी मागणी मान्य झाली आहे. करोनाची दुसरी लाट आल्यावर गेल्या एप्रिलमध्ये सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आली होती. रुग्ण कमी झाल्याने प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, घटस्थापनेपासून म्हणजेच ७ ऑक्टोबरला राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे खुली करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली. दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे नियोजन आपण केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.