नगर परिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिधापत्रिकांच्या एकगठ्ठा वितरणावर संशय

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालघर : पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीत आपल्या बाजूने मतदान व्हावे यासाठी काही उमेदवारांनी आपल्या भागातील मतदारांना नवीन शिधापत्रिका तयार करून देण्याचे आमिष दाखवल्याचे प्रकरण पुढे येऊ लागले आहे. या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ऑक्टोबर २०१८मध्ये तयार केलेल्या शिधापत्रिकांचे एकगठ्ठा वितरण झाल्याने हे सर्व प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. याप्रकरणी योग्य तक्रार दाखल झाल्यास चौकशी करण्याचे आणि बोगस शिधापत्रिका रद्द करण्याची तयारी पालघरच्या तहसीलदारांनी दाखवली आहे.

पालघरमधील काही ग्रामीण व निमशहरी भागांत मतदारांचा कल आपल्याकडे वळवण्यासाठी काही उमेदवारांनी गेल्या वर्षी तयार करून घेतलेली शिधापत्रिका स्वत:कडे बाळगून ठेवली. निवडणुकीच्या पूर्वसंध्येला शिधापत्रिका संबंधित मतदारांना दाखवण्यात आली आणि मतमोजणीनंतर आपल्या अनुकूल निकाल लागला तर ती शिधापत्रिका संबंधित नागरिकांकडे सुपूर्द करू, अशी धमकावणी केली गेल्याने साहजिकच काही ठरावीक उमेदवारांच्या बाजूने मतदान झाल्याचे आरोप होऊ  लागले आहेत.

मतमोजणी झाल्यानंतर अशा प्रकारच्या सुमारे शंभर ते दीडशे शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले असून या शिधापत्रिकांचे अनुक्रमांक सलग असल्याने याबाबत काही जणांनी शंका उपस्थित केली आहे. शिवाय ऑक्टोबर २०१८च्या शिधापत्रिका पाच महिने कोणाकडे एकत्रितपणे ठेवण्यात आल्या होत्या, पुरवठा विभागाने संबंधित धारकाच्या हातात शिधापत्रिका देण्याऐवजी ती थेट एखाद्या मध्यस्थाच्या हातात का दिली, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याचबरोबरीने ऑक्टोबर २०१८मध्ये पदभार नसलेल्या अधिकाऱ्याच्या स्वाक्षऱ्या त्यावर असल्याने या शिधापत्रिकांविषयी आक्षेप घेतला जाऊ लागला आहे.

पालघरमधील काही अतिक्रमित जागांवर राहणाऱ्यांसाठी या शिधापत्रिका बनवण्यात आल्याचा आरोप असून या सर्व रहिवाशांकडे घरपट्टी, आधारकार्ड किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे रहिवासी पुरावे नसल्याचे माहिती पुढे येत आहे. बनावट शिधापत्रिकांच्या आधारे या रहिवाशांचे नाव मतदारयादीत समाविष्ट करण्यात आल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पालघरमधील काही पराभूत उमेदवारांनी तहसीलदारांची भेट घेतली असता तक्रार अर्ज प्राप्त झाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे पालघरचे तहसीलदार महेश सागर यांनी आश्वासन दिले आहे.

पालघरचे पुरवठा अधिकारी यांना जिल्ह्याचा अतिरिक्त कार्यभार असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी निवासी नायब तहसीलदार यांना स्वाक्षरी करण्याचे अधिकार देण्यात आले होते. तरीही या सर्व शिधापत्रिकांची पडताळणी करून आवश्यक ती कागदपत्रे नसल्यास शिधापत्रिका रद्द करण्यात येतील. याप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर सविस्तर चौकशी करण्यात येईल.

– महेश सागर, तहसीलदार पालघर

पालघर पूर्वेकडील भागांत ५० हून अधिक पालघर शहराबाहेरील नागरिकांना कोणत्याही पुराव्याशिवाय पुरवठा विभागाने शिधापत्रिका वितरित केली आहे. या शिधापत्रिका बोगस असल्याची तक्रार पालघर तहसीदारांकडे करण्यात आली आहे. या शिधापत्रिकांच्या आधारे मतदारयादीत नावे समाविष्ट करण्यात आल्याचे संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

-आरिफ कालाडिया, पराभूत उमेदवार, पालघर.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Candidate contesting palghar municipal council polls promise from new ration card