चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रात एका कामगाराचा बळी घेणाऱ्या पट्टेदार नर वाघाला बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन देऊन रात्री ९.३० वाजताच्या सुमारास पकडण्यात आले आहे. वन्यजीव विभागाचे मुख्य वन संरक्षक यांनी वीज केंद्रातील ४ वाघांना पकडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर वन पथक या वाघांचा शोध घेत होते.
रात्री उशिरा ९.३० वाजताच्या सुमारास चंद्रपूर वीज केंद्र ऊर्जानगर वसाहतीतील न्यू एफ गाळा येथे चंद्रपूर वीज केंद्र विशेष पथक आणि वनविभागाची संयुक्त मोहिम सुरू असताना वाघ दिसला. त्याला शूटर अजय मराठे व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी डॉट मारला. यात वाघ बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याला पकडण्यात वन खात्याला यश आले. वाघ पकडला अशी माहिती मुख्य वन संरक्षण एन.आर. प्रवीण, वीज केंद्राचे मुख्य अभियंता पंकज सपाटे यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.
वाघाला पकडणाऱ्या टीममध्ये यांचा समावेश
डॉ.रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी वन्यजीव ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, श्री.अजय मराठे, श्री.राकेश आहुजा, पवन कुळमेथे, अतुल मोहुर्ले, भोजराज दांडेकर, अमोल कोरपे, अमोल तिखट, नन्नवरे या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या आरआर टीमचा समावेश होता.