Chhagan Bhujbal on Sharad Pawar : “तेलगी प्रकरणात सीबीआयने माझं नाव घेतलं नव्हतं, तरीदेखील मला राजीनामा द्यावा लागला”, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) नेते व आमदार छगन भुजबळ यांनी केलं आहे. “कुठेही माझं नाव नसताना मला उपमुख्यमंत्री व गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. शरद पवारांनी माझा राजीनामा घ्यायची फार घाई केली”, असंही भुजबळ म्हणाले. बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली आहे. वाल्मिकबरोबर यात मंत्री धनंजय मुंडे यांचा देखील सहभाग होता असा आरोप विरोधक करत आहेत. या आरोपासह मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. मात्र, पक्षाचे प्रमुख अजित पवार हे धनंजय मुंडेंच्या पाठिशी उभे आहेत त्यांनी अद्याप मुंडे यांचा राजीनामा मागितलेला नाही. मात्र, तेलगी प्रकरणात दोन दशकांपूर्वी भुजबळांना राजीनामा द्यावा लागला होता. याच पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दलची मनातील खदखद व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छगन भुजबळ म्हणाले, “हे तेलगी प्रकरण तीन राज्यांमध्ये झालं होतं. त्यामुळे मी सर्वोच्च न्यायालयात गेलो. तिथे मी न्यायालयाला विनंती केली की या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा. न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे दिलं. त्यानंतर मी ट्रकभर कागद, दस्तावेज घेऊन गेलो. त्यात कुठेही माझं नाव नव्हतं. तसेच सीबीआयने देखील कुठेही माझं नाव नमूद केलेलं नाही. तरीसुद्धा मला उपमुख्यमंत्री व राज्याच्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मी कुठे तोंड दाखवणार होतो. माझ्या माथी एक शिक्का बसला की हा तेलगी प्रकरणातला आरोपी आहे. शरद पवारांनी माझा राजीनामा घेण्याची घाई केली. त्यामुळेच हे सगळं घडलं”.

छगन भुजबळांची शरद पवारांवर नाराजी

छगन भुजबळ म्हणाले, “मला शरद पवार यांना सांगायचं आहे की तेलगी प्रकरणात माझा राजीनामा घेण्याची त्यांनी घाई केली. शरद पवार आता सांगत असतात, तपासात पुढे काय होणार हे माहिती नव्हतं. मात्र, पुढे काय होणार हे राजकारण होतं. त्यावेळी माझं नाव नव्हतं तरीदेखील माझा राजीनामा घेतला गेला”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal claims cbi didnt mention me in abdul telgi stamp paper scam 2003 still sharad pawar asked my resigantion asc