राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या काम बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे. याचबरोबर, संपकरी आंदोलकांना प्रोत्साहन देणाऱ्यांना व विरोधकांवर देखील त्यांनी निशाणा साधला आहे. “कर्मचाऱ्यांना आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका”, असं मुख्यमंत्री विरोधकांना उद्देशून म्हणाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तर, संपकरी आंदोलकांना आवाहन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, “एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्यशासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले, असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केलं आहे.”

तसेच, “अशा परिस्थितीत माझी आपणास हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. आधीच आपण सर्वच जण अजूनही करोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे.” असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

ही वेळ राजकारणाची नाही हे लक्षात घ्या –

याचबरोबर “राजकीय पक्षांनी देखील गरीब एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन, आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका अशी माझी त्यांनाही कळकळीची विनंती आहे. ही वेळ राजकारणाची नाही हे लक्षात घ्या.” असं मुख्यमंत्री विरोधकांना उद्देशून म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister uddhav thackeray criticizes the opposition over the st workers agitation msr