मराठा आरक्षण हा मुद्दा घेऊन मनोज जरांगे पाटील २९ ऑगस्टपासून उपोषण आंदोलन करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांना मंगळवारी (१२ सप्टेंबर) या दिवशी उपोषण मागे घेण्याचीही विनंती करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एक व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिसत आहेत. मुख्यमंत्री शिंदे त्यात असं म्हणतात की आपण बोलून मोकळं व्हायचं. याविषयीच्या बातम्या समोर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विट करून एक आपलं म्हणणं मांडलं आहे. तसंच व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांचा निषेध केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हटलं आहे एकनाथ शिंदेंनी?

मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकार परिषदेपूर्वी आपला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा माईकवरील संवाद ‘सोशल मीडीया’वरून चुकीच्या पध्दतीने संपादित करुन फिरविणे अत्यंत खोडसाळपणाचे आहे.

मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासून संवेदनशील असून कायद्याच्या चौकटीत बसेल असे आरक्षण देण्याबाबत सरकार प्राधान्याने काम करीत आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत पहिल्यांदाच अशा सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलावून या विषयी त्यांचे एकमत घेण्यात आले आहे. शासनाने इतकी चांगली भूमिका घेतली असतांना मुद्दामहून काही विरोधक खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत हे अतिशय निंदनीय आहे. आमच्या एकमेकांमधील संवादाची मोडतोड करून संपादित करून दाखवून या घटकांनी जाणीवपूर्वक निंदनीय कृत्य केले आहे. शासन एकीकडे या संवेदनशील विषयावर ठोस भूमिका आणि निर्णय घेत आहे. अशा पार्श्वभूमीवर समाजात सोशल मीडियातून गैरसमज निर्माण करण्याचा कृत्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे.

मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये नेमका काय संवाद?

एकनाथ शिंदे – “आपल्याला काय? बोलायचं अन् निघून जायचं, बोलून मोकळं व्हायचं.”
अजित पवार – “हो……येस’

देवेंद्र फडणवीस – “माईक चालू आहे.”

मराठा आरक्षणाबाबत जी चर्चा झाली त्यानंतर पत्रकार परिषदेत भूमिका मांडण्याआधी हा संवाद झाला असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल केलं जातं आहे. संभाजी भिडे यांनी मंगळवारी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लबाड नाहीत, फडणवीस फसवणूक करणार नाहीत आणि अजित पवार काळीज असलेला माणूस आहे अशी भावनिक साद मनोज जरांगे पाटील यांना घालत उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. त्याचाही संदर्भ या व्हिडीओमध्ये देऊन या तिघांनाही ट्रोल केलं जातं आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भूमिका मांडली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde said government is serious about maratha reservation also slam people who spread that video scj