अमरावती : यंदाच्या हंगामातील कापूस बाजारात येण्यास अवकाश असला, तरी जागतिक बाजारातील परिस्थितीमुळे कापसाच्या बाजारात मंदीचे सावट असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या पाच ते सहा महिन्यांमध्ये देशात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची टंचाई निर्माण होऊन दर तेजीत आले होते. पण आता देशातील अनेक बाजारांमध्ये नवा कापूस दाखल झाला असून त्याला चांगला दरही मिळाला आहे, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर काहीसे नरमले आहेत.

यंदा भारत, पाकिस्तानात अतिवृष्टीमुळे तर चीनमध्ये कोरडय़ा दुष्काळामुळे कापसाचे उत्पादन कमी होणार, अशी चर्चा आहे. अमेरिकेतही पावसाचे प्रमाण कमी असल्याने उत्पादन घटणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यानच्या काळात अमेरिकेच्या कापूस बाजारात भाव कोसळू लागले होते. मागील वर्षी एक पाऊंड रुईचा दर १ डॉलर ७० सेंटपर्यंत वाढला होता. तो मध्यंतरी १ डॉलर १५ सेंटपर्यंत घसरला होता. कमी उत्पादनाच्या बातमीमुळे तो वाढून १ डॉलर ३० सेंटपर्यंत वाढला होता. देशात पंजाब, हरियाणाच्या बाजारपेठेत नवीन कापसाची आवक झाली आहे. प्रारंभी ९ ते १० हजार रुपये प्रतििक्वटलच्या जवळपास भाव होते, त्यामुळे यंदा देखील चांगले भाव मिळतील, अशी आशा निर्माण झाली होती. परंतु ही आशा निराशेत बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे शेती अभ्यासक विजय जावंधिया यांचे म्हणणे आहे.

आजचा अमेरिकेच्या कापूस बाजारातील १ पाऊंड रुईचा भाव हा १ डॉलर १२ सेंटपर्यंत घसरला आहे. याचाच अर्थ असा होतो की, हा भाव आणखी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण, हा भाव जरी स्थिर राहिला, तरी दसऱ्याच्या मुहूर्तावर कापूस खरेदी सुरू झाली, तर प्रारंभी ८ ते ९ हजार रुपये प्रतििक्वटल कापसाचे भाव राहण्याची शक्यता आहे. यात सरकीचे भाव ३ हजार रुपये प्रति क्विंटल मिळतील, असा अंदाज आहे. सोयाबीनच्या मंदीमुळे हे भाव कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही विजय जावंधिया यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, १ डॉलर १२ सेंट प्रति पाऊंड रुईचा भाव हा अमेरिकेच्या बाजारात १९९४-९५ मध्ये होता. त्यावेळी भारतातील कापूस उत्पादकांना २ हजार ५०० ते २ हजार ७०० रुपये प्रति िक्वटलचे भाव मिळाले होते. यंदा ते ८ हजार रुपयांपर्यंत रुपयाच्या अवमूल्यनामुळे मिळणार आहेत, हे अनेकांना लक्षात येणार नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. रुपयाच्या अवमूल्यनामुळेच सोयाबीन, गहू, तुरीला हमीभाव मिळण्याची शक्यता आहे, असे निरीक्षण विजय जावंधिया यांनी नोंदविले आहे.

जागतिक बाजारात कापसाच्या भावात ३० ते ३५ टक्के मंदीचा फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. सध्या कापसाचे दर स्थिर आहेत. पण, आशादायक स्थिती नाही. सरकारने शेतमालाच्या आयातीवर रद्द केलेला आयात कर त्वरित लावण्याचा निर्णय घेतला पाहिजे.

विजय जावंधिया, शेती अभ्यासक

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cotton growers of vidarbha likely to face recession in this season zws