“कोविडचा रूग्ण वेळेत ओळखला गेला पाहिजे. त्याच्यापासून त्याचं कुटंबं वाचवलं पाहिजे, त्याला तर वाचवलंच पाहिजे पण त्याचा कुटुंबीयांना संसर्ग झाला नाही पाहिजे. अनावश्यक औषधांचा अतिरेकी वापर ही एक मोठी डोकेदुखी होते म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर या गोष्टी होता कामानये.” असं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ऑनलाईन कार्यशाळेचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी अधिक खबरदारी घेणं गरजेचं असल्याचंही सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “माझं मत आहे की कोविडचा रूग्ण वेळेत ओळखला गेला पाहिजे. त्याच्यापासून त्याचं कुटंबं वाचवलं पाहिजे, त्याला तर वाचवलंच पाहिजे पण संसर्ग हा त्याचा कुटुंबीयाना होता कामानये. कारण, आता जी तिसऱ्या लाटेची शक्यता आहे, ती लहान मुलांमध्ये येईल का? येईल ना येईल हा अंदाज आहे. पण लहान मुलांमध्ये कोणाच्या मार्फत येईल? जसं पहिल्या लाटेत आपण सांगत होतो की मी सुरक्षित तर माझं कुटुंबं सुरक्षित. साहाजिकच आहे पहिल्या लाटेच्या वेळी करोनाबाधितांपासून ज्येष्ठ नागरिकांना याचा धोका अधिक होता. तसं जर आता वयाचं अनुमान लावलं तर करोनाबाधित कुंटुंबातील एकजण असेल, तर त्याच्यापासून मुलांना करोना संसर्ग होण्याची जास्त शक्यता आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याल करोना होऊ न देणं. आपण करोनापासून दोन हात लांब राहणं. हे सगळ्यांनी अंगीकारलं पाहिजे.”

तसेच, “काही वेळा गरज नसतानाही रूग्ण रूग्णालयात जातो व काही वेळेला गरजेचं असतानाही तो उशीरा जातो आणि विलंबामुळे मग तो दगावतो. या दोन्ही गोष्टी ओळखता आल्या पाहिजेत. तसेच, अनावश्यक औषधांचा अतिरेकी वापर ही एक मोठी डोकेदुखी होते. जास्त काळासाठी स्टेरॉईड देणं व इतर औषधं देणं हे टाळलं गेलं पाहिजे. म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर या गोष्टी होता कामानये.” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

याचबरोबर “पावसाळा सुरू झाल्यानंतर इतर जे आजार उद्भवणार याबाबत देखील उपचार करताना, काय सावधानाता बाळगायला हवी, हे लक्षात घेऊन तुम्हाला ती उपचार पद्धती अवलंबावी लागणार आहे. आतापर्यंतचा जो अनुभव आहे त्यानुसार ज्याला सहव्याधी (कोमॉर्बिडीटी) आहे, त्याच्यावर या विषाणूचा जास्त घातक दुष्परिणाम होतो. अशावेळी त्याची सहव्याधी लक्षात घेऊन उपचार केले पाहिजे. या कोवडिसाठी आपल्याकडे काही औषधी येत आहेत. परंतु त्यांचे दुष्परिणाम कशावर होतील? याचा देखील विचार केला गेला पाहिजे. ” असंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid patient should be identified in time chief minister uddhav thackeray msr