पुणे/नागपूर/नगर : ‘एच३एन२’ या विषाणूमुळे राज्यातील दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नागपूर आणि अहमदनगरमधील हे दोन रुग्ण असून सहव्याधी असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी ‘एच३एन२’ विषाणूच्या फैलावाबाबत माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात विषाणुजन्य आजारांचे रुग्ण वाढत आहेत. वातावरणातील सततचे बदलही त्याला कारणीभूत आहेत; मात्र एच३एन२च्या पार्श्वभूमीवर रुग्णांनी गाफील न राहता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन  तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. ताप, सर्दी, अंगदुखी, डोकेदुखी, उलटय़ा-जुलाब अशा लक्षणांचे रुग्ण सध्या बऱ्याच प्रमाणात दिसत आहेत. त्याचबरोबर ताप आणि इतर लक्षणे नियंत्रणात आल्यानंतर सुमारे १५ ते २० दिवस राहणारा खोकला हे एच३एन२ या संसर्गाचे लक्षण आहे. त्यामुळे केवळ हवामानबदल म्हणून याकडे न पाहता लक्षणे अंगावर काढू नयेत आणि शक्य तेवढय़ा तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सुचवण्यात येत आहे.

दरम्यान, नागपूर महापालिका क्षेत्रात ‘एच३एन२’चा संसर्ग झालेल्या ७८ वर्षीय रुग्णाचा झालेला मृत्यू हा त्या रुग्णाला असलेल्या मूत्रिपडविकार, हृदयरोग, मधुमेह अशा अनेक सहव्याधींचाही परिणाम असल्याचे महापालिकेच्या मृत्यू अंकेक्षण समितीने स्पष्ट केले. महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

संपर्कातील इतरांना लक्षणे नाहीत

राज्यात एच३एन२ मुळे दगावलेल्या दोन रुग्णांमध्ये अहमदनगर येथील एका तरुणाचा समावेश आहे. सदर तरुण वसतिगृहात राहत होता. त्याला संसर्ग झाला असला तरी त्याच्या संपर्कात आलेल्या कोणालाही आजाराची लक्षणे आढळलेली नाहीत, त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. मात्र प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन अहमदनगरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप जगदाळे यांनी केले आहे.

‘एच३एन२’ची लक्षणे

ताप, खोकला, घसा खवखवणे, धाप लागणे तसेच न्यूमोनियासदृश लक्षणे आढळल्यास तो ‘एच३एन२’ असू शकतो. ताप लवकर बरा होतो आणि दीर्घकाळ खोकला राहतो, हेदेखील एक प्रमुख लक्षण आहे. सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार राज्यात एच१एन१ संसर्गाचे सुमारे ३०३, तर एच३एन२ संसर्गाचे ५८ रुग्ण आढळले आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, सांगली, कोल्हापूर, नागपूर परिसरातही अशा लक्षणांचे रुग्ण अधिक आहेत. त्यामुळे दुर्लक्ष करू नये आणि प्रतिबंधासाठी मुखपट्टीचा वापर करावा, असे आवाहन आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.

मार्गदर्शक सूचनांचा अभाव

राज्यात ‘एच३एन२’चे रुग्ण वाढत असताना कोणत्या चाचण्या करायच्या, उपचार कसे करावेत, याबाबत शासनाने कोणत्याही मार्गदर्शक सूचना अद्याप प्रसिद्ध केलेल्या नाहीत. त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्याबाबत डॉक्टरांमध्ये संभ्रम असल्याचे चित्र आहे. सरकारने तज्ज्ञांकरवी वेळीच योग्य ते मार्गदर्शन करण्याची मागणी डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death of two h3n2 patients comorbidity causes death ysh