विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. भाजपाकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक विधान परिषद आणि राज्यसभेप्रमाणे चुरशीची ठरणार आहे. उद्या ३ जुलै रोजी ही निवडणूक पार पडणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधीमंडळाचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांना व्हीप जारी केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनाच सर्वांनी मतदान करावं, असा आदेश आमदारांना देण्यात आला आहे. व्हीप जारी केल्याने एकनाथ शिंदे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आमच्याकडे बहुमत असल्याने सुनील प्रभू यांनी जारी केलेला व्हीप आम्हाला लागू होत नाही, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

“आम्ही बहुमत चाचणीला सामोरं जाणार आहोत. आमच्याकडे बहुमत असल्याने विजय आमचाच होईल,” असंही ते म्हणाले. ते गोवा विमानतळावर माध्यमांशी बोलत होते. खरंतर, बंडखोरी केल्यानंतर तब्बल अकरा दिवसांनी शिवसेनेचे आमदार मुंबईत दाखल होत आहेत. ते गोव्यातून मुंबईसाठी रवाना झाले आहेत.

खरंतर, एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे विधीमंडळातील गटनेते होते. पण त्यांनी बंडखोरी केल्यानंतर तातडीची कारवाई म्हणून उद्धव ठाकरे यांनी त्यांची गटनेते पदावरून हकालपट्टी केली होती. तसेच नवीन गटनेते म्हणून अजय चौधरी यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर आज विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधीमंडळाचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांसाठी व्हीप जारी केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनाच मतदान करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde first reaction after whip ordered by sunil prabhu to all shivsena mla rmm