शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात कथित बंड पुकारल्यानंतर पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांना शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदावरुन बडतर्फ केलं आहे. एकनाथ शिंदेंनी कथित बंड पुकारल्यानंतर शिवसेनेनं घेतला हा सर्वात मोठा निर्णय आहे. अजय चौधरी यांच्याकडे शिवसेनेच्या गटनेते पदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय.

नक्की वाचा >> एकनाथ शिंदेंच्या बंडावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हा शिवसेनेचा…”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधानसभेच्या गटनेता पदावरुन एकनाथ शिंदेंना हटवण्यात आलं आहे. शिवसेनेनं केलेल्या या कारवाईमुळे आता शिवसेना एकनाथ शिदेंविरोधात कठोर कारवाईच्या भूमिकेत असल्याचे संकेत देण्याबरोबरच या कारवाईमुळे शिंदे आता शिवसेनेमध्ये राहणार की नाही याबद्दलच्या चर्चांना पुन्हा नव्याने उधाण आलं आहे.

विधानसभेमधील पक्षाचा गटनेता हा विधानसभेच्या पटलावर पक्षाच्या प्रतिनिधिंकडून कोणते विषय मांडायचे, कोणाला बोलण्याची संधी द्यायची, पक्षाची भूमिका का आहे हे निश्चित करणं यासारखी महत्वाची जबाबदारी पार पाडतो. एकनाथ शिंदे यांच्याकडे २०१९ पासून हे पद होतं. गटनेता हा विधानसभेमधील आमदारांचा कामकाजादरम्यानचा मुख्य दुवा आणि नेता असतो. मातोश्रीवर शिवसेनेच्या आमदारांसोबत झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी या पदावरुन एकनाथ शिंदेंना हटवण्याचा निर्णय घेतलाय. आता एकनाथ शिदेंऐवजी ही जबाबदारी शिवसेनेचे शिवडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अजय चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

दरम्यान, एकनाथ शिदेंशी चर्चा करण्यासाठी रविंद्र फाटक आणि मलिंद नार्वेकर सुरतला रवाना झाले आहेत. आपण चर्चेसाठी तयार असल्याचं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं असून ट्विटरवरुनही त्यांनी “आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत, बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही,” असं म्हटलंय.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde removed from post of leader of legislature for shivena scsg
First published on: 21-06-2022 at 15:04 IST