गेल्या काही दिवसांपासून डीआरडीओचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यावरील कारवाईची चर्चा चालू आहे. कुरुलकर हनी ट्रॅपमध्ये अडकले आणि त्यांनी भारतीय संरक्षण विभागाशी संबंधित महत्त्वाची माहिती शत्रूराष्ट्राला दिल्याचा दावा केला जात आहे. यासंदर्भात दहशतवादविरोधी विभागाकडून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. यासंदर्भात आता हवाई दलातील एक तरुण अधिकारी निखिल शेंडे यांचंही नाव घेतलं जात आहे. मात्र, निखिल पूर्णपणे निर्दोष असून त्याच्याशी आम्ही सातत्याने संपर्कात आहोत, अशी प्रतिक्रिया त्याच्या पालकांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निखिल शेंडे यांच्या मोबाईलवर कुरुलकरांशी संबंधित काही गोष्टी सापडल्याचा दावा केला जात आहे. त्यासंदर्भात त्यांची चौकशीही करण्यात येत आहे. या सर्व प्रकरणामुळे कुरुलकरांपासून सुरू झालेलं हे हनी ट्रॅप प्रकरण देशात आणखीन काही जणांपर्यंत पोहोचल्याचंही बोललं जात असताना स्वत: निखिल शेंडे यांच्या कुटुंबीयांनी मात्र ते निर्दोष असल्याचं ठामपणे म्हटलं आहे. त्यांच्याशी सातत्याने संपर्क होत असल्याचंही ते म्हणाले.

“त्याच्याशी फोनवर बोलणं झालं, तो म्हणाला…”

निखिल शेंडे यांच्या आई लीला शेंडे यांनी यासंदर्भात एबीपीशी बोलताना प्रतिक्रिया दिली. “माझं त्याच्याशी फोनवर बोलणं झालं. तो म्हणाला असं काही नाहीये. मोबाईलमध्ये नंबर आला तर त्यासाठी चौकशीसाठी नेलं मला असं सांगितलं त्यानं. २०१५ला तो नोकरीला लागला. माझा मुलगा एवढा साधा आहे की त्याला हे काही समजत नाही. हे कसं काय झालं त्यालाच नाही कळलं. आम्हालाही माहिती नाही काय झालं. त्याला कसं फसवलं हे काही समजत नाही. तो कशातच नाहीये”, असं त्या म्हणाल्या.

सरळमार्गी निखिलचे मैदान, घर हेच विश्व! ‘हनीट्रॅप’ प्रकरणातील हवाईदल अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांची भावना

“नोकरी लागली तेव्हा तो बंगळुरूलाच होता. त्यानंतर पाटण्याला गेला. त्यानंतर पुन्हा तो बंगळुरूला आला. तो धावपटू होता. क्रॉसकंट्री खेळत होता. त्यामध्ये तो पहिला नंबरच आणायचा. तो चांगला खेळाडू आहे”, असंही त्यांनी नमूद केलं.

“त्याचा फोन चौकशीसाठी जप्त केलाय”

“आम्हाला काही माहितीच नाही. जेव्हा ते पेपरमध्ये आलं तेव्हाच आम्हाला माहिती पडलं. त्यानं मित्राच्या मोबाईलमधून फोन केला होता. आम्ही विचारलं तर तो म्हणाला की काही मोठं प्रकरण नाहीये. मला चौकशीसाठी बोलवलं आहे. तू काही घाबरू नको म्हणे. त्याचा मोबाईल चौकशीसाठी जप्त केला आहे. पण त्यात काहीही मिळालेलं नाही”, असंही निखिल शेंडे यांच्या आईंनी सांगितलं.

“डॉ. कुरुलकरांशी त्याचा काहीही संबंध नाही”

“त्याच्या खेळाच्या भरवशावरच नोकरीला लागला. आज ४-५ वेळा बोलणं झालं त्याच्याशी. माझी चौकशी झाली, मी निर्दोष सुटलो. डॉ. कुरुलकरांना तो ओळखतही नाही. त्यांच्याशी त्याचा काहीही संबंध नाही”, अशी प्रतिक्रिया निखिल शेंडे यांच्या वडिलांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honey trap kurulkar nikhil shende air force mother says he is innocent pmw