सोलापूर : शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या उपनेतेपदी सोलापूर जिल्ह्यातील शरद कोळी यांची नेमणूक झाल्यामुळे पक्षात धुसफूस वाढली आहे. पक्षाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख साईनाथ अभंगराव यांनी कोळी यांच्या नेमणुकीला तीव्र विरोध करून थेट पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. शरद कोळी यांनी शिवसेनेत फूट पडल्यानंतर उध्दव ठाकरे गटात जात प्रथमच राजकारणात पदार्पण केले होते. त्यांची पूर्वपीठिका वादग्रस्त ठरली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदी पात्रातून होणाऱ्या वाळू तस्करीच्या विरोधात सातत्याने आवाज उठविताना त्यांनी काहीवेळा संकट ओढवून घेतले आहेत. धाडस नावाच्या संघटनेच्या माध्यमातून वाळू तस्करांच्या विरोधात लढा देताना मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने कोळी यांना काही वर्षे सशस्त्र पोलीस संरक्षणही देण्यात आले होते. पोलीस संरक्षण असताना कोळी यांच्यावर खंडणी मागणीचे गुन्हे दाखल झाले होते. या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर कोळी यांना लगेचच पक्षाचे प्रवक्तेपद देण्यात आले. त्यानंतर नुकतेच त्यांना उपनेतेपदावर बढती मिळाली.
हेही वाचा : “मनोज जरांगेंच्या मागणीला माझी मान्यता नाही”, मराठा आरक्षणाबाबत रामदास कदमांची थेट भूमिका
परंतु या बढतीला सोलापूर जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख साईनाथ अभंगराव यांनी जोरदार विरोध दर्शवित थेट पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करण्याची भूमिका जाहीर केली आहे. अभंगराव हे शिवसेनेत ४० वर्षांपासून कार्यरत आहेत. ‘शरद कोळी हे उपनेते म्हणून आपण सहन करणार नाही, सध्या मातोश्रीवर चालले तरी काय?’, असा सवाल अभंगराव यांनी केला आहे.