Jitendra Awhad : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड हे आता पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आले आहेत. शरण येण्यापूर्वी त्यांनी स्वतःचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये त्यांनी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. राजकीय द्वेषापोटी माझ्याविरोधात आरोप केले जात असून जर पोलिस तपासात मी दोषी आढळलो तर जी शिक्षा होईल, ती भोगण्यासाठी मी तयार असल्याचे ते म्हणाले आहेत. दरम्यान या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

मागच्या पाच वर्षांत जेवढे खून झाले आहेत त्या सगळ्याची चौकशी करा. अनेक लोक तुम्हाला सांगतील त्यामागे कोण आहेत. माझ्याकडे एका म्हाताऱ्या बापाचं पत्र आहे की माझ्या मुलाला उडवून मारलं. आम्ही न्यायालयीन चौकशी करायची मागणी करतो आहे. मुख्यमंत्री म्हणाले आहेत की मोक्का लावला जाईल, न्यायालयीन चौकशी होईल. आम्हाला अपेक्षा आहे की ज्या कठोर पद्धतीने ते बोलले आहेत त्याचप्रमाणे कारवाई करतील असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

देवेंद्र फडणवीस खरोखरच गुन्हेगारांना सोडणार नाहीत अशी अपेक्षा आहे-आव्हाड

देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची देहबोली बदलली आहे. मला वाटत नाही की देवेंद्र फडणवीस कुठल्याही गुन्हेगाराला माफ करतील. मी इथेच नाही हे मी हाऊसमध्येही सांगितलं आहे. जी गोष्ट चांगली आहे ती मान्य केली पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेला हा बदल सकारात्मक आहे असंही जितेंद आव्हाड यांनी म्हटलं आहे. संतोष देशमुख यांच्यासह सोमनाथ सूर्यवंशी यांनाही न्याय मिळेल अशी अपेक्षा करुया.

हे पण वाचा- Sambhaji Raje : संभाजीराजेंचा सवाल, “देवेंद्र फडणवीसांची धनंजय मुंडेंसह काल भेट, आज वाल्मिक कराड शरण, हे..”

वाल्मिक कराड ताब्यात आला पण आका बाहेरच आहे-आव्हाड

वाल्मिक कराड ताब्यात आला पण आका बाहेरच आहे. जेव्हा आरोप होतो आहे तेव्हा त्यात मंत्र्याचं नाव आलं तर तपास होईपर्यंत मंत्री खुर्ची सोडून बाजूला बसतो हा इतिहास आहे तुम्ही तपासू शकता असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. अख्ख्या बीडला माहीत होतं, पुण्यातल्या समर्थकांना माहीत होतं की राजे येणार आहेत, राजे फौज घेऊन आले. हे सगळं पोलिसांना आव्हान आहे की तुम्ही काही करु शकत नाही मी येतो आहे तुमच्याकडे शरण. पोलिसांचा दबाव आणि भीती ही गुन्हेगारांच्या मनात असलीच पाहिजे. एका पोशाखाची भीती सामान्यांना वाटलीच पाहिजे हे अॅरिस्टॉटल किंवा प्लुटो पासून सगळ्यांनी लिहून ठेवलं आहे. हे सगळं गुन्हेगारीचं उदात्तीकरण आहे असंही आव्हाड म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad reaction about walmik karad surender but also ask question about aaka scj