Jitendra Awhad on Santosh Deshmukh murder Case : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला ८० दिवस उलटले आहेत. अद्याप या प्रकरणातील कोणत्याही आरोपीला शिक्षा झालेली नाही. तीन दिवसांपूर्वी सीआयडीने याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केलं आहे. या दोषारोप पत्राद्वारे हत्याकांड प्रकरणाशी संबंधित अनेक खुलासे झाले आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जाणारा वाल्मिक कराड हाच या हत्याकांडाचा सूत्रधार असल्याचं दोषारोप पत्रात म्हटलं आहे. त्याचबरोर सीआयडीच्या दोषारोप पत्रातून या घटनेचे काही फोटो समोर आले आहेत. हृदय पिळवटून टाकणारे हे निर्घृण हत्याकांडाचे फोटो पाहून राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. वाल्मिक कराड व त्याच्या टोळीतील साथीदारांना कठोर शासन व्हावं, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जावा ही मागणी तीव्र झाली होती. अशातच हत्याकांडानंतर ८० दिवसांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. मुंडे यांनी त्यांच्या स्वीय सहाय्यकामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा पाठवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, “हा राजीनामा घेण्यास सरकारने ८० दिवस लावले. निर्घृण हत्याकांडाचे काळीज चिरणारे फोटो पाहिल्यानंतरही सरकारने मुंडेंचा राजीनामा घेतला नाही. कारण हे सरकार पाषणहृदयी आहे”, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. आव्हाड यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर यासंबंधीची पोस्ट केली आहे.

हे फोटो व व्हिडीओ सरकारडे आधीपासूनच होते तरी कारवाई झाली नाही : आव्हाड

जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की “संतोष देशमुख हत्याकांडाचे आरोपपत्र दाखल झाले. हे आरोपपत्र दाखल करताना अनेक फोटो आणि व्हिडिओज सादर करण्यात आले. या फोटोज आणि व्हिडिओची कल्पना सरकारला आधीच होती. किंबहुना, हे सर्व फोटो आणि व्हिडिओ सरकारकडे आधीच होते. पण, हे फोटो – व्हिडिओ पाहिल्यावर सरकारच्या हृदयाला पाझर कसा फुटला नाही? निर्दयी सरकारच्या हृदयात कालवाकालव कशी झाली नाही? हे सर्व पुरावे असतानाही राजीनामा घेतला गेला नाही. पण, काल (सोमवार, ३ मार्च) रात्री हे फोटो, व्हिडिओ लोकांपर्यंत गेल्यानंतर आज सकाळी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला, यावरून हे सरकार किती निर्दयी आहे, हे स्पष्ट झालं आहे.”

आव्हाड म्हणाले, “लोकभावनेची कदर न करणारे हे पाषाणहृदयी सरकार संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा गुन्हा सहन करतं. यावरूनच दिसतंय की महाराष्ट्राची अधोगती कोण करतोय? राज्यातील गुन्हेगारांची हिमंत वाढू लागली आहे. पण, बुंद से गयी वो हौद से नही आती! आता महाराष्ट्रात होणारा लोक उद्रेक पाहून त्यास वेगळे वळण देण्यासाठी विरोधी आमदाराचे स्टेटमेंट घेऊन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न कराल. पण, असे स्टेटमेंट देणाऱ्याची मानसिकता आता जनता पुरती ओळखून आहे. त्याचा बोलवता धनी कोण असेल, हे जनतेच्या लक्षात आलं आहे!”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad slams mahayuti govt for no action despite having photos videos of santosh deshmukh brutal murder asc