कनिष्ठ महाविद्यालयीन कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचा आरोप

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे वडिल माजी आमदार व्ही. एन. पाटील यांनी दबंगगिरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील घुंगशी येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन त्यांनी तेथील कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून त्याच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार शनिवारी घडला. या प्रकरणी मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात रविवारी तक्रार दाखल करण्यात आली. विशेष म्हणजे या सर्व प्रकारची एक चित्रफित समाजमाध्यमांवर वायरल झाली आहे.

मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय असलेले गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ.रणजित पाटील यांच्या संस्थेचे त्यांचे मूळ गाव असलेल्या घुंगशी येथे विद्यालय आहे. त्या गावापासून १२ कि.मी.अंतरावर असलेल्या मंगरूळकांबे येथे त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय सुद्धा आहे. घुंगशी गावात विज्युक्‍टा संघटनेचे पदाधिकारी असलेले प्रा. संजय देशमुख यांचे भाऊसाहेब देशमुख कनिष्ठ महाविद्यालय आहे. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशावरून दोन्ही संस्थांमध्ये गेल्या १५ वर्षांपासून वाद सुरु आहे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या मान्यतेवरून शिक्षण विभागाकडे व न्यायालयातही या संस्थांमध्ये वाद सुरु असल्याची माहिती आहे. दरम्यान, गृहराज्यमंत्री डॉ. पाटील यांचे वडिल माजी आमदार व्ही. एन. पाटील यांनी काल संजय देशमुख यांच्या भाऊसाहेब देशमुख कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन तपासणी केली. यावेळी त्यांच्यासोबत माध्यमिक शिक्षण विभागातील आत्माराम राठोड हे अधिकारी उपस्थित होते. व्ही.एन. पाटील तपासणी करत असताना कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संजय आठवले हे या सर्व  प्रकरणाचे चित्रिकरण करीत होते. त्यावर चित्रिकरण कशाला घेता असे म्हणत पाटील यांनी प्राचार्य व कर्मचाऱ्यांशी वाद घातला. हा वाद विकोपाला गेल्याने  व्ही. एन. पाटील यांनी अमोल काळे नामक कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली. त्यावर अनधिकृतपणे तपासणी करून, कर्मचाऱ्याला मारहाण करीत असल्याचा आरोप प्राचार्यांनी केल्याचे चित्रफितमध्ये दिसून येते. या प्रकरणी आज मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी ती तक्रार चौकशीत ठेवल्याची माहिती आहे.

व्ही. एन. पाटील यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली, प्राचार्यांना सुद्धा शिवीगाळ केली आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. – प्रा. संजय देशमुख, अध्यक्ष, भाऊसाहेब देशमुख कनिष्ठ महाविद्यालय.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra bjp minister ranjit patil father and former mla v n patil beat college employee in akola