आंबोलीच्या खोल दरीतून दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल होणार आहे. ही घटना वाचलेल्या तिसऱ्या मित्राने पोलिसांना सांगितली.
कराड येथील दोन मित्रांमध्ये देवघेवीवरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारी व त्यानंतर खून असे झाल्यामुळे नाटय़मयरीत्या आंबोली घाटामध्ये मिळालेले दोन मृतदेह यामुळे या दुहेरी हत्याकांडाला नाटय़मय वळण मिळाले आहे.
कराड येथील दोन मित्रांमध्ये वीट कामगारांचा पुरवठा करण्यावरून आर्थिक व्यवहार झाले. जी रक्कम काही लाखांमध्ये होती. ही रक्कम भाऊसो अरुण माने (वय ३०) रा. कराड याने सुशांत खिल्लारे (वय २८) याला दिली होती. परंतु वर्षभर तो पैसे व सांगितलेले कामही करत नसल्याने भाऊसो माने यांनी आपला मित्र तुषार पवार यांच्यासोबत सुशांत खिल्लारे याला कराड येथे निर्जनस्थळी बोलावून घेतले व आपल्या व्यवहाराचे काय झाले असे विचारणा केली. तसेच त्याला मारहाण केली. तुषार पवार (वय २८) व भाऊसो माने यांनी सुशांत याला बेदम मारहाण केली. यात सुशांत याचा मृत्यू झाला. याच परिस्थितीत दोघेही घाबरल्यामुळे त्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आंबोली घाटात टाकण्याचा निर्णय घेतला. ते कराड येथून आंबोली घाटात सोमवारी सायंकाळी पोहोचले.
आंबोली घाटातील मुख्य धबधब्यापासून सावंतवाडीच्या दिशेने एक किलोमीटर गेल्यानंतर त्यांनी गाडी चालूच ठेवून रात्रीच्या अंधारात म्हणजे सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मृतदेह खाली फेकण्यासाठी बाहेर काढला व संरक्षक कठडय़ावर उभे राहिले. सद्य:स्थितीत पर्यटन हंगाम कमी असल्यामुळे रस्त्यावर म्हणावे तितकी वाहतूकही नव्हती. याचा फायदा घेत त्यांनी मृतदेह फेकण्यासाठी कठडय़ावर उभे राहिले. परंतु यावेळी नेमका सुशांतचा मृतदेह खाली फेकताना त्याच वेळी मृतदेह फेकणाऱ्या भाऊसो माने याचाही तोल गेला. त्यामुळे तोसुद्धा दरीमध्ये कोसळला .
परंतु तिसरा मित्र तुषार मात्र यातून बालंबाल बचावला. त्याने स्वत:ला सावरले व तो वरच राहिला. तुषारने आपला मित्र भाऊसो माने याला हाका मारल्या, परंतु कोणताही उपयोग झाला नाही. तुषार याने चालू असलेली गाडी तशीच पुढे पूर्वीचा वस मंदिर येथे आणली व गाडी बंद केली. यानंतर तुषार याने घडलेला प्रकार भाऊसो माने याच्या नातेवाईकांना सांगितला. त्यांनी लागलीच याबाबत पोलिसांना खबर दिली.
यानंतर आज मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास आंबोली पोलिसांना याबाबत कराड पोलिसांकडून खबर देण्यात आल्यानंतर तात्काळ आंबोली पोलीस व आंबोली रेस्क्यू टीममार्फत घटनास्थळी शोध मोहीम सुरू केली. घटनास्थळी शोधत असताना रेस्क्यू टीमला दोन मृतदेह आढळून आले. सायंकाळी ४ वाजेपर्यंत दोन्ही मृतदेहांना वर काढण्यात आले व शवविच्छेदनासाठी सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
यावेळी सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, पोलीस उपनिरीक्षक अमित गोते, आंबोली पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई ,पोलीस कॉन्स्टेबल दीपक नाईक, दीपक शिंदे, तसेच आंबोली रेस्क्यू टीमचे मायकल डिसूजा, उत्तम नार्वेकर, हेमंत नार्वेकर, विशाल बांदेकर, संतोष पालेकर, राजू राऊळ, अजित नार्वेकर आदी उपस्थित होते. मृतदेह काढण्यासाठी आपत्कालीन यंत्रणेला यश आले.
आंबोली घाटात मृत्यूनंतर मृतदेह टाकण्याचा प्रकार धक्कादायक असून सिनेमासदृश चित्र निर्माण झाले आहे. यानंतर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी सखोल चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी तिसरा मित्र तुषार याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.