महाड : महाड औद्योगिक वसाहतीमधील मल्लक स्पेशालिटीज केमिकल्स या कारखान्याला बुधवारी भीषण आग लागली. रिअ‍ॅक्टरमध्ये आग लागल्यानंतर स्फोट झाल्याने कारखान्याच्या प्रॉडक्शन विभागाची इमारत पूर्णपणे जमीनदोस्त झाली. सुदैवाने या घटनेत प्राणहानी झाली नाही. मात्र, अंगावर काचांचे तुकडे उडाल्याने मल्लक आणि लगतच्या कारखान्यांतील बारा कामगार जखमी झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास रिअ‍ॅक्टरमधील बॅचचे प्रोसेसिंग सुरू असताना आग लागली. क्षणार्धात या आगीने रौद्र रूप धारण करीत संपूर्ण प्रॉडक्शन युनिट आपल्या लपेटय़ात घेतले. प्रशासनाने धोक्याचा सायरन वाजवीत सर्व कामगारांना बाहेर पडण्याची सूचना दिली. मात्र रिअ‍ॅक्टरमध्ये स्फोट होऊन काचा अंगावर उडाल्याने मल्लक, श्रीहरी आणि प्रिव्ही ऑरगॅनिक्स या कारखान्यांतील बारा कामगार जखमी झाले. स्फोटांचे हादरे दहा ते बारा किलोमीटरच्या अंतरापर्यंत जाणवले, तर रिअ‍ॅक्टरचे तुकडे कारखान्याच्या पाचशे मीटर परिघात उडाल्याचे दिसून आले.

महाड एमआयडीसी अग्निशमन दलाचे दोन, प्रिव्ही, लक्ष्मी ऑरगॅनिक्सच्या प्रत्येकी एक, महाड, खेड, रोहा, पेण नगरपालिका आणि माणगांव नगर पंचायतीच्या प्रत्येकी एक अशा नऊ अग्निशमन बंबांनी सुमारे साडेबारा ते एक वाजेदरम्यान या आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र त्यानंतरही ही आग धुमसत होती.

महाडच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार सुरेश काशिद, एमएमएचे चेअरमन संभाजी पाठारे, व्हा. चेअरमन अशोक तलाठी, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे हे घटनास्थळी जातीने उपस्थित राहून परिस्थिती नियंत्रणात राहील याची काळजी घेत होते. आग व्यापक प्रमाणात पसरणार नाही यासाठी एमएमए मार्गचे प्रमुख महागावकर आणि त्यांच्या पथकाने मेहनत घेतली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Massive fire in mahad industrial estate company building ysh