नगर/कर्जत : कर्जतमधील हल्ला प्रकरणाची राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी भाजप आमदार नीतेश राणे यांनी येथे केली. अमरावतीमधील घटनेच्या वेळी महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यामुळे ती घटना दाबण्याचे प्रयत्न झाले. परंतु आता राज्यात हिंदूत्ववादी सरकार आले आहे. हिंदूत्ववाद्यांना लक्ष करण्याचे प्रयत्न सहन केले जाणार नाहीत, चौकशी करताना पोलिसांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी, असा इशारा त्यांनी दिला. भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे या वेळी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्जत हल्ला प्रकरणात जखमी झालेला सनी ऊर्फ प्रतीक पवार हा तरुण नगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. भाजपा आमदार राणे व आमदार पडळकर यांनी आज, सोमवारी दुपारी त्याची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.  त्यानंतर त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची तसेच कर्जतमध्ये तपासी अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर आ. राणे, पडळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशीची मागणी करणार असल्याचे सांगितले.

अमरावतीच्या घटनेचा ‘एनआयए’मार्फत चौकशी सुरू केल्यानंतर त्यातील काहींचा सिमी, पीआयए व रझा अकादमीशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले. त्याच प्रकारे कर्जतमधील घटनेत जिहादी संघटनांचा हात आहे का, याचीही सखोल चौकशी पोलिसांनी करावी. कर्जतच्या घटनेकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बारकाईने लक्ष आहे. त्यामुळे हे प्रकरण दाबण्याची हिंमत पोलीस करणार नाहीत. पोलिसांनीही आता महाविकास आघाडीचे सरकार नाही, असे समजून काम करावे, असेही राणे म्हणाले.

प्रतीक पवारला जुन्या भांडणातून मारहाण झाल्याचे, तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असे खोटे रंगवले जात आहे. खरे कारण नूपुर शर्माला पाठिंबा देणारा ‘डीपी’ ठेवल्या प्रकरणातूनच मारहाण झाली आहे. आपण या संदर्भातील समाज माध्यमावरील संवाद जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. त्यामध्ये मारहाण करताना मोदी व नूपुर शर्माच्या नावाने शिव्या दिल्या जात होत्या. हिंदू असल्याचा उल्लेख केला जात होता. त्यामुळे आपण प्रतीक पवारला हिंमत देण्यासाठी येथे आलो. हिंदूंना टार्गेट करण्याचा प्रयत्न यापुढे सहन केला जाणार नाही, असेही राणे म्हणाले.

सात जणांना बुधवापर्यंत पोलीस कोठडी

दरम्यान, पोलिसांनी काल, रविवारी अटक केलेल्या शाहरुख आरिफ पठाण (२८), इलाई महबूब शेख (२०), आकिब कुदरत सय्यद (२४) टिपु सरिम पठाण (१८), साहिल शौकत पठाण (२३) हर्षद शरीफ पठाण (२०) व निहाल इब्राहिम पठाण (२०, सर्व रा. कर्जत) कर्जतच्या न्यायालयापुढे आज सोमवारी हजर केले. तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या युक्तिवादानंतर सातही जणांना न्यायालयाने बुधवापर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. अटक केलेल्या इतर ७ जणांच्या पोलीस कोठडीची मुदत बुधवारी संपत आहे.

चंद्रशेखर यादव यांच्या बदलीची मागणी

आमदार नीतेश राणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या भेटीत कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या बदलीची मागणी केली. यादव एकतर्फी कारवाई करतात, चुकीचे वक्तव्य करतात, खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण कर्जतमध्ये वाढले आहेत असा आरोप त्यांनी केला. त्यावर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी यादव यांच्या विरोधात तक्रार असेल तर लेखी द्यावी, आपण चौकशी करू असे सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla nitesh rane gopichand padalkar demand to investigate karjat attack case through nia zws
First published on: 09-08-2022 at 03:20 IST