शिवसेनेच्या ठाकरे गटातील १४ आणि शिंदे गटातील ४० आमदारांच्या अपात्रतेबाबत आज (१४ सप्टेंबर) सकाळपासून प्रत्यक्ष सुनावणीला सुरूवात झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर स्वत: ही सुनावणी घेत आहेत. दोन्ही गटांनी आपापली प्रतिज्ञापत्रं सादर केली आहेत, त्याचा अभ्यास केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष आता प्रत्येक आमदारांचं मत जाणून घेतील. त्यानंतर राहुल नार्वेकर आमदार अपात्रतेबाबत निर्णय जाहीर करतील. विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी सुरू झाली आहे.
विधानसभा अध्यक्ष आज एकाच दिवशी शिंदे गट आणि ठाकरे गटातील आमदारांची सुनावणी घेणार आहेत. यासाठी सर्व आमदारांना प्रत्यक्ष सुनावणीला हजर राहण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे. दम्यान, या सुनावणीपूर्वी विधान भवनात शिवसेनेच्या ठाकरे गटातील आमदारांची एक बैठक पार पडली.
या सुनावणीत कोणाच्या बाजूने निकाल लागणार? शिंदे गटातील आमदार अपात्र ठरणार की शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार? असे अनेक प्रश्न नेत्यांसह राज्यातील जनतेला पडले आहेत. अशातच कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. त्यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, विधानसभा अध्यक्षांच्या सुनावणीत चुकीचा निर्णय झाला तर आमदार सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊ शकतात.
हे ही वाचा >> “लोकसभेवेळी कडक नोटा घेतल्या”, नवनीत राणांच्या दाव्यावर यशोमती ठाकूर संतापल्या, १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार
कायदेतज्ज्ञ उल्हास बापट म्हणाले हे प्रकरण आता विधानसभा अध्यक्षांकडे आलं आहे. ही पूर्णपणे कायदेशीर प्रक्रिया आहे. कलम २१२ या कलमाखाली ही प्रक्रिया राबवली जाईल. त्यामुळे न्यायालयाला यात हस्तक्षेप करता येत नाही. आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार हा विधानसभा अध्यक्षांनाच आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष आता कशा पद्धतीने तपासणी करतात, दोन्ही बाजू ऐकून काय निर्णय देतात, त्यांना नेमकं काय वाटतं हे पाहावं लागेल. परंतु, त्यांनी अगदीच चुकीचा निर्णय दिला तर त्यांच्याविरोधात पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाता येईल.