अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि काँग्रेस आमदार आमदार यशोमती ठाकूर यांच्यात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. अलिकडेच नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप केला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी यशोमती ठाकूर यांनी रवी राणांकडून कडक नोटा घेतल्या, असा दावा नवनीत राणा यांनी केला होता. त्यावर यशोमती ठाकूर संतापल्या आहेत. या आरोपानंतर यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणांवर जोरदार हल्लाबोल केला. आमदार ठाकूर नवनीत राणांना उद्देशून म्हणाल्या, राणांनी शहाणपण करत बोलायचं नाही. सिद्ध करून दाखव म्हणावं, साxxx हराxxx… नाहीतर राजकारण सोडून देऊ.
दरम्यान, यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं सांगितलं आहे. यशोमती ठाकूर यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. यावेळी आमदार ठाकूर म्हणाल्या, ते नवरा-बायको म्हणजेच राणा कंपनीने आजवर अमरावती जिल्हा नासवण्याचं काम केलं आहे. त्यांचं जिल्ह्यात कोणाशीच पटत नाही.
आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या राणा दाम्पत्याचं अमरावतीत कोणाशीच पटत नाही. मागे ते आमदार बच्चू कडूंबाबत बोलले, मग त्यांनी माफी मागितली. यांनी प्रत्येकावर आरोप केले. काल (१३ सप्टेंबर) आमदार बळवतंराव वानखेडेंबाबत बोलले, मग भाजपा नेते प्रवीण पोटेंबाबत बोलले. मुळात हे (राणा दाम्पत्य) काय दुधाने धुतलेले आहेत का? हीच सगळ्यात घाणेरडी मंडळी आहे. त्यामुळे मी यांच्याविरोधात १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे. कारण असं कोणीही काहीही सहन करणार नाही.
हे ही वाचा >> १७ व्या दिवशी बेमुदत उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
नवनीत राणा काय म्हणाल्या होत्या?
नवनीत राणा यांनी गेल्या आठवड्यात अमरावतीत दहीहंडी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात नवनीत राणा म्हणाल्या होत्या की “लोकसभा निवडणुकीवेळी माझ्याबरोबर फिरून यशोमती ठाकूर यांनी रवी राणांकडून कडक नोटा घेतल्या. रक्ताचे आश्रू ढाळण्याचं काम ठाकूर यांनी केलं होतं.” यावर यशोमती ठाकूर यांनीही उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, “उगाच अफवा पसरवायच्या नसतात. आम्ही तुम्हाला वहिनी म्हणून स्वीकारलं होतं. निवडून आणण्यासाठी दारोदार फिरलो. पण, वहिणींचं प्रमाणपत्रच खोटं निघालं. त्या स्वत: चोर निघाल्या.”