शिवसेनेतील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे अर्ज करत थेट पक्षाच्या निवडणूक चिन्हावरच दावा केला. मात्र, ठाकरे गटाने या मागणीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. अखेर मंगळवारी (२७ सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असल्याचं म्हणत पक्षाच्या चिन्हाबाबतचा निर्णय आयोगाकडे सोपवला. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. “राज ठाकरेंनी सांगितलं आहे की विचारधारा असेल तर लोकांकडे जाऊ शकतो, लोक सोबत येतात,” असं मत नांदगावकरांनी व्यक्त केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाळा नांदगावकर म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर प्रतिक्रिया देणं मला योग्य वाटत नाही. न्यायालयाच्या निकालानंतर आता निवडणूक आयोग निर्णय घेईल. आपल्याकडे विचारधारा असेल तर आपण ती विचारधारा घेऊन लोकांकडे जाऊ शकतो. राज ठाकरेंनीही याबाबत सांगितलं आहे. तेव्हा माध्यमंही उपस्थित होती. विचार घेऊन लोकांकडे गेलं की लोकं विचारांसोबत येतात.”

हेही वाचा : शिवसेना पक्षचिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगाकडे, शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “देशात पहिल्यांदा…”

छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावरही बाळा नांदगावकरांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर ते म्हणाले, “देवी-देवतांचा सन्मान राखणं आपलं काम आहे. त्यावर बोलणं मला उचित वाटत नाही. छगन भुजबळ माझ्यापेक्षा फार मोठे नेते आहेत. याशिवाय बुद्धीनेही ते माझ्यापेक्षा मोठे असल्याने त्यांना जे कळलं असेल त्याप्रमाणे ते बोलले असतील. आपण देवी-देवतांचा सन्मान राखायला आलो आहे आणि आपण तो राखत आहोत.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns bala nandgaonkar first reaction on supreme court judgement on shivsena symbol rno news pbs