शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे अलिकडच्या अनेक जाहीर सभांमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत असल्याचं पाहायला मिळालं आहे. कधी ‘कलंक’, तर कधी ‘टरबूज’ असा उल्लेख करत ते अप्रत्यक्षपणे फडणवीसांवर टीका करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात जळगावात सभा जाहीर सभा घेतली होती. या सभेतही त्यांनी फडणवीसांना लक्ष्य केलं. उद्धव ठाकरे म्हणाले, “टरबुजासारखा माणूस मी पाहिलेला नाही. पण, आता टरबुजासारखा गोल माणूस मी पाहतो, त्यांनी (देवेंद्र फडणवीस) भाजपा आणि पक्षातील प्रतिस्पर्धी एकनाथ खडसे यांना संपवण्याचं काम केलं आणि आता आयारामांना पक्षातील निष्ठावंतांच्या उरावर बसवलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी २८ ऑगस्ट रोजी हिंगोली येथे निर्धार सभेतूनही देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती. निर्धार सभेत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांचा जपान दौरा, राज्यातील दुष्काळाची परिस्थिती आणि महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जाण्यावरून फडणवीस यांच्यावर तिरकस टोलेबाजी केली. राज्यात दुष्काळ पडला असताना देवेंद्र फडणवीस जपानला गेले. टरबुजाच्या झाडालाही पाण्याची आवश्यकता असते, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टोलेबाजी केली होती.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या टीकेला केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नारायण राणे यांनी मराठा आरक्षणाच्या विषयावर आज पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत नारायण राणे उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हणाले, काय नाव ठेवता हो तुम्ही आमच्या देवेंद फडणवीसांना? काय नाव वापरता? त्याचा अर्थ तरी कळतो का? टरबुजात कोणते व्हिटॅमिन्स आहेत? टरबूज खाल्ला तर गोड लागतो का कडू लागतो माहितीय का?
हे ही वाचा >> “खरे प्रतोद कोण? हा कळीचा मुद्दा ठरला तर…”, आमदार अपात्रतेसंदर्भात आमदार भरत गोगावले स्पष्टच बोलले
नारायण राणे म्हणाले, त्यांनी (उद्धव ठाकरे) ते नाव ठेवलं. पण मला वाटतं, आमचे देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंपेक्षा हजार पटीने देखणे आहेत. वैचारिक, बौद्धिक, सामाजिक आणि शैक्षणिक अशा सगळ्या क्षेत्रांचा त्यांचा अभ्यास आहे.