जयप्रभा स्टुडिओची जागा ताब्यात घेण्याकरिता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर महापालिकेकडून प्रस्ताव देण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
राजेश क्षीरसागर यांनी सांगितले की, “कोल्हापूर चित्रपट सृष्टीच्या इतिहासाचा साक्षीदार असणारा जयप्रभा स्टुडिओ भारतरत्न लता मंगेशकर यांनी खरेदी केला होता. त्यातील निम्मी जागा काही वर्षांपूर्वी विकली होती. उर्वरित जागा महालक्ष्मी स्टुडिओज या भागीदारी फर्मने कायदेशीर रित्या खरेदी केली आहे. हा व्यवहार कायदेशीर असला तरी स्टुडिओ बाबत कोल्हापूरकरांच्या भावना जोडल्या आहेत. यामुळे खरेदीदार कंपनीस नियमाप्रमाणे शासनाने पर्यायी जागा द्यावी आणि स्टुडिओचा विकास करावा, अशी मागणी आपण नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली होती. त्यावर एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर महापालिकेकडून जयप्रभा स्टुडिओची जागा ताब्यात घेण्याबाबत नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली आहे.”
जयप्रभा स्टुडिओचे मुंबईतील चित्रनगरीच्या धर्तीवर संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील –
तसेच, “स्टुडिओचे जतन केले जावे या मागणीसाठी कोल्हापुरातील चित्रकर्मी आणि चित्रपट महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या भावनांशी आपण सहमत आहोत. जयप्रभा स्टुडिओचे मुंबईतील चित्रनगरीच्या धर्तीवर संवर्धन करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्यामुळे आंदोलन मागे घ्यावे.” अशी अपेक्षाही राजेश क्षीरसागर यांनी यावेळी व्यक्त केली.
माझ्या मुलांचे नुकसान करू देणार नाही –
याचबरोबर, “मी राजकीय क्षेत्रात असलो तरी माझ्या स्थापत्य अभियंता असलेल्या मुलांना व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य अधिकार आहेत, असा उल्लेख करून राजेश क्षीरसागर म्हणाले यांनी सांगितले की, राजकारण्यांच्या मुलांना व्यवसाय करण्याचे अधिकार आहेत, या पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मताचे मी स्वागत करतो. स्टुडिओच्या खरेदी प्रकरणी मी माझ्या मुलांचे नुकसान होऊ देणार नाही. जयप्रभा स्टुडिओच्या खरेदीनंतर या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागून घेतली. त्याचा तपशील समजल्यानंतर त्यांनी माझा राजेश चुकणार नाही असा अभिप्राय व्यक्त केलेला आहे.” अशी देखील माहिती यावेळी राजेश क्षीरसागर यांनी दिली.
तर “कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक लक्षात घेऊन काहींनी मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हे षड्यंत्र दूर करून लोकभावने प्रमाणे मी या निवडणुकीत विजयी होईल.”, असा विश्वासही राजेश क्षीरसागर यांनी यावेळी व्यक्त केला.