राज्यातल्या करोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे शासनाने आता लॉकडाउनचे निर्बंध हळूहळू शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या १८ जिल्ह्यांमधले निर्बंध पूर्णपणे उठवण्यात येणार असून इतर काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाउनचे निर्बंध अंशतः लागू राहणार आहेत. पण पुण्यात मात्र सध्या आहेत तेच निर्बंध कायम राहणार आहेत.
गेल्या आठवड्यात पुण्यातल्या करोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने झालेल्या आढावा बैठकीत पुण्यातला विकेंड लॉकडाउन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या नव्या नियमांनुसार पुण्यातली अत्यावश्यक सेवेतली दुकाने आठवड्याचे सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहतील. त्याचप्रमाणे इतर दुकानेही सोमवार ते शुक्रवार याच वेळेत सुरु राहतील. मात्र, दुपारी तीननंतर संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात येईल. या वेळात नागरिकांना बाहेर पडता येणार नाही.
आणखी वाचा- Maharashtra Unlock : राज्यात ५ टप्प्यांमध्ये होणार अनलॉक; विजय वडेट्टीवारांची मोठी घोषणा!
आज मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वड़ेट्टीवार यांनी राज्याच्या अनलॉकसंदर्भात माहिती दिली. यावेळी त्यांनी टप्प्याटप्प्यात लॉकडाउन हटवणार असल्याचं सांगितलं. पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यांमधला लॉकडाउन हटवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या १८ जिल्ह्यांमधल्या सर्व सेवासुविधा नियमितपणे सुरु करण्यात येणार आहेत. या जिल्ह्यांमधला रुग्ण बाधित आढळण्याचा दर ५ टक्क्यांहून कमी असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे.
आणखी वाचा- राज्यात अनलॉकची सुरुवात: जाणून घ्या कोणत्या टप्प्यात काय सुरु आणि काय बंद राहणार!
तसंच राज्यातल्या जिल्ह्यांचं करोना प्रादुर्भावाच्या अनुषंगानं वर्गीकरण करण्यात आलं आहे. या वर्गीकरणानुसार पुणे आणि रायगड हे दोन्ही जिल्हे चौथ्या टप्प्यांमध्ये आहेत. त्यामुळे सध्या तरी पुण्यातले निर्बंध हटवण्यात येण्याची कोणतीही शक्यता समोर दिसत नाही.