मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक नेते रामदास कदम यांनी रत्नागिरीतील दापोलीमधील भाषणात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबरोबरच त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंवर केलेल्या टीकेमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. रामदास कदमांविरोधात शिवसेनेच्या महिला आघाडीबरोबरच अनेक कार्यकर्त्यांना आंदोलनं केली आहेत. असं असतानाच आता रामदास कदम यांनी रश्मी ठाकरेंबद्दलचं वादग्रस्त विधान आपण मागे घेत असल्याचं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “तुमच्या बापाच्या नावावर…”, ‘उद्धव बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा संशय आहे का?’ प्रश्नावरुन सेनेचा हल्लाबोल; माँ साहेबांचाही केला उल्लेख

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाकरे गटाच्या समर्थक असणाऱ्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रामदास कदमांच्या टीकेला उत्तर दिल्यानंतर रामदास कदम यांनी टीव्ही ९ या मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना रश्मी ठाकरेंविरोधातील विधान आपण अनावधानाने केल्याचं सांगितलं. तसेच आपण हे विधान मागे घेत असल्याचंही ते म्हणाले. अंधारेंच्या टीकेवर तुम्ही काय म्हणाला? असा प्रश्न रामदास कदम यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना रामदास कदम यांनी, “एक गोष्ट मी बोलायला नको होती, ती म्हणजे रश्मी वहिनी स्टेजवर कशासाठी. हे माझ्याकडून बोलून गेलं हे मान्य. हे बोलण्याची आवश्यकता नव्हती. त्या उद्धवजींच्या पत्नी आहेत. अनेक मुख्यमंत्र्यांच्या पत्नी स्टेजवर येतात. त्याबाबतचं वाक्य मी मागे घेतो. मला काही अडचण नाही त्याची. ते अनावधानाने माझ्याकडून बोलून गेलं आहे,” असं उत्तर दिलं.

नक्की वाचा >> शरद पवारांनी राज ठाकरेंच्या मर्मावर ठेवलं बोट; म्हणाले, “हाताच्या बोटावर मोजता येतील इतके सुद्धा…”

मात्र त्याचवेळी रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंच्या लग्नाचा मुद्दा आपण योग्य पद्धतीनेच मांडल्याचा युक्तीवाद केला. “आदित्य यांच्याबद्दल मी जे बोललो आहे त्याचा खुलासा मी केला पाहिजे. तो असा खुलासा आहे की आदित्य ठाकरेंनी जी महाराष्ट्रामध्ये भाषण केली त्यात गद्दार आणि खोके यापलीकडे काही नाही. तुम्ही अडीच वर्ष मंत्री होता. तुमचे वडील मुख्यमंत्री होते. या अडीच वर्षात तुम्ही शेतकऱ्यांसाठी, बेरोजगारांसाठी, धनगरांसाठी काय केलं हे सांगा ना भाषणांमध्ये. फक्त एकच विषय गद्दार आणि खोका. म्हणून म्हटलं तुम्ही लग्न केलं. दोन-चार मुलं झाली की तुम्हाला कळेल की लोकांचं दुखणं काय असतं ते. यात चुकीचं काय आहे?” असा प्रतिप्रश्न अंधारे यांना विचारला.

नक्की वाचा >> पत्रा चाळ प्रकरण : शरद पवारांच्या चौकशीच्या मागणीवर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “…त्यानंतर मी नक्की…”

रामदास कदम रश्मी ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हटलं होतं?
रत्नागिरीमधील सभेतील भाषणात रामदास कदमांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पत्नी माँसाहेब यांचा उल्लेख केला. माँसाहेब कधीही कोणत्या व्यासपीठावर दिसत नव्हत्या, मग रश्मी ठाकरे का दिसतात? अशी विचारणा रामदास कदम यांनी केली. “आमच्या रश्मी वहिनी मंत्रिमंडळात कशा नाही आल्या याचं आश्चर्य वाटतं,” असा टोला रामदास कदम यांनी लगावला होता. “कुठेही गेल्या तरी त्या सोबत हव्यातच. माँसाहेब कधी कोणत्या कार्यक्रमात गेल्या नाहीत, व्यासपीठावर चढल्या नाहीत,” अशी टीका यावेळी त्यांनी केली होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas kadam says i says i take my words back about uddhav thackeray wife rashmi scsg