जोगेश्वरीमधील सुप्रिमो क्लबच्या जागेचा गैरवापर तसेच, तिथे हॉटेल बांधताना तथ्य लपवल्याच्या आरोपाखाली माजी मंत्री व ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ईडीने मंगळवारी वायकर यांच्या घरासह सात ठिकाणी छापे टाकले. वायकरांविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सप्टेंबर महिन्यात गुन्हा दाखल केला होता. त्याच गुन्ह्याच्या आधारावर ईडी याप्रकरणी तपास करीत आहे. दरम्यान याप्रकरणी रवींद्र वायकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रवींद्र वायकर म्हणाले, अशा पद्धतीने कारवाई होणं चुकीचं आहे. आर्थिक गुन्हे शाखेला आम्ही कागदपत्रे दिली. मुंबई महानगरपालिकेच्या कायद्यानुसार आयुक्तांनी परवानगी दिली होती. मुंबईच्या आयुक्तांनी परवानगी दिल्यानंतर दोन वर्षांनी ती परवानगी रद्द केली जाते. त्या परवानगीमध्ये किरिट सोमय्यांना उत्तरे दिली जातात. त्या उत्तराची कॉपी दिली होती. कोणतीही अनियमितता नसून दोन्ही हॉटेलना परवानगी देण्यात आली आहे, असं उत्तर किरीट सोमय्यांना दिलं गेलं आहे. त्यापद्धतीने आम्हाला परवानगी दिली आहे. मग कायद्याचं उल्लंघन झालं कुठे? १५ टक्क्याचं बांधकाम दिलं आहे. एखादी वास्तू तोडून तिथे नवं बांधकाम करताना आताचा नियम लागणार. त्यानुसार परवानगी दिली होती. सर्वोच्च न्यायालायने आम्हाला दिलासा दिला असून ईडीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. ईडीच्या चौकशीसाठी मी पुन्हा ईडी कार्यालयात जाणार आहे.

हेही वाचा >> ठाकरे गटाचा आणखी एक नेता अडचणीत, आमदार रवींद्र वायकरांच्या घरावर ईडीची धाड

काय आहे प्रकरण?

जोगेश्वरी भूखंड आणि पंचतारांकित हॉटेल प्रकरणातील आर्थिक व्यवहारांबाबत ईडी तपास करीत आहे. याप्रकरणी सप्टेंबर महिन्यात महापालिकेचे उपअभियंता संतोष मांडवकर यांच्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलीस ठाण्यात रवींद्र वायकर यांच्यासह त्यांची पत्नी मनीषा वायकर, त्यांचे व्यावसायिक भागीदार आसू नेहलनाई, राज लालचंदानी, पृथ्वीपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरुण दुबे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्याचा तपास मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. याच गुन्ह्याच्या आधारावर ईडीने नोव्हेंबर महिन्यात एन्फोर्समेंट केस इन्फर्मेशन रिपोर्ट (ईसीआयआर) दाखल केला होता. त्याप्रकरणी आता ईडीने वायकर यांच्या घरासह सात ठिकाणी छापे टाकले आहेत. त्यात इतर आरोपींच्याही संबंधित ठिकाणांचाही समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबईतील जोगेश्वरी येथील सुप्रिमो क्लबचा गैरवापर करून तिथे हॉटेल्स बांधताना माहिती लपवल्याचा आरोप रवींद्र वायकर यांच्यावर करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravindra waikars first reaction after the ed raids said by demolishing an edifice sgk